खोपोली | पटेलनगर, मिळगांव आदिवासीवाडीत तीन बांगलादेशी महिला आणि आश्रय देणार्या महिलेला खोपोली पोलिसांनी गुरुवारी, १५ मे रोजी अटक केली आहे. या तिन्ही बांग्लादेशी महिला दहा दिवसांपूर्वी खारघर येथून खोपोलीत वास्तव्यासाठी आल्या होत्या. त्यांना आश्रय देणारी महिलाही बांग्लादेशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून अटक केलेल्या महिलांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खारघर येथून बांग्लादेशी महिलांनी खोपोलीकडे मोर्चा वळविल्याने खळबळ उडाली आहे. तर खोपोली पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करुन बेकायदा अधिवास करणार्या लोकांमध्ये बांग्लादेशी नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. अशा बांग्लादेशी नागरिकांची शोध मोहीम राबविण्याचे आदेश रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक, अभिजीत शिवथरे यांनी दिले होते.
उपविभागीय विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्यास गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजा चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक के.एस.निकाळजे यांच्या पथकाने १५ मे रोजी पटेलनगर, मिळगांव आदिवासीवाडीत राहणार्या मरुफा अझर कुरेशी (वय ५०) हिच्या घरी बांगलादेशी महिला वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर धाड टाकली. मात्र ही महिला दरवाजा उघडत नव्हती. अखेर सहाय्यक पोलीस निरिक्षक पूजा चव्हाण यांनी पोलिसी खाया दाखविताच दरवाजा उघडण्यात आला.
यावेळी सलिना सलीम शेख (वय ४०), नजमा सलीमान फकीर (वय ३०), पॉपी सलीम शेख (वय २४) या बांग्लादेशी महिला सापडल्या. या तिघीही बांग्लादेशमधील जामरील डांगा, कालीया थाना जि. नाराईल येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे पासपोर्ट आणि भारत देशामध्ये प्रवेश करण्याकरिता भारताचा व्हिसा अशा कायदेशीर कागदपत्रांची मागणी केली असता त्यांच्याकडे अशाप्रकारची कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे आणि त्यांनी भारत देशामध्ये अनधिकृतपणे व कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय प्रवेश केल्याचे मान्य केले.
तसेच दहा दिवसांपूर्वीच त्या खारघर येथून खोपोलीत आल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. आश्रय देणारी महिला मरुफा अझर कुरेशी, वय ५०, रा. मिळ कातकर वाडी, पटेलनगर ही देखील बांग्लादेशी नागरिक असल्याचा संशय आहे. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाणे येथे कॉ.गु.र.नं. १३२/२०२५, पारपत्र (भारतात प्रवेश) कायदा सन १९२० चे कलम ३(१) (३), पारपत्र (भारतात प्रवेश) कायदा सन १९५० चे कलम ३ (अ) चा भंग कलम ६ व विदेशी व्यक्ती अधिनियम सन १९४६ चे कलम ७, १४, १४ अ, (अ) (ब) प्रमाणे १६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची दिनांक २० मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक के.एस. निकाळजे, पोलीस नाईक सतीश बांगर, आशा भोये, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील लाड, पोलीस कॉन्स्टेबल प्रणित कळमकर यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे हे करीत आहेत.