पनवेल | जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त करून समाचार घेतला. त्या अनुषंगाने ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी मोहिमेतील भारतीय सशस्त्र दलाच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने १८ मे रोजी पनवेलमध्ये ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली.
या यात्रेची सुरुवात पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एशारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली तर समारोप स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याला अभिवादन करून झाले. या मार्गक्रमणादरम्यान संपूर्ण पनवेल शहर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले होते.

हातात तिरंगा ध्वज, मनात राष्ट्राभिमान आणि भारत माता की जय, वंदे मातरम जयघोष घेऊन पनवेलकरांनी या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या यात्रेत पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, शिवसेनेचेजिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आिेशनी पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, तळोजा मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, उलवे मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ, कर्नाळा मंडल अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, अजय बहिरा, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते युवकवर्ग, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या तिरंगा यात्रेद्वारे पनवेलवासीयांनी आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक आणि परिणामकारक कारवाई करत शत्रूला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. या मोहिमेमुळे देशाची सुरक्षा, सक्षमता आणि आक्रमकता यांचे वैशिष्ट्य अधिक ठळक झालेअसून या ऐतिहासिक लष्करी कारवाईमुळे प्रत्येक भारतीयाचा मस्तक अभिमानाने उंचावला आहे.
हे पराक्रम देशाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या जवानांचे आणि देशासाठी कठोर निर्णय घेणार्या नेतृत्वाचे प्रतीक आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करत असल्याचे सांगून त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला आणि देशसेवेच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला पूर्ण सूट दिली आणि सैन्याने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली पाकिस्तानने आपल्या देशावर हल्ले केले मात्र आपल्या देशाच्या सैन्याने चोख उत्तर देत त्यांचे हल्ले परतवून लावत त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आणि अखेर पाकिस्तानला आपल्या भारत देशापुढे शरणागती पत्करावी लागली. भारत देश हा संस्कृती आणि एकतेने नटलेला देश आहे, त्यामुळे भारतावर हल्ले करणार्यांना जशास तसे आणि कठोर उत्तर मिळेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.