राबगाव/पाली | प्रत्येक गोरगरिबाच्या डोक्यावर स्वतःचे छप्पर असावे, यासाठी शासन घरकुल योजनेची अंमलबजावणी सर्वत्र करीत आहे. सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायत हद्दीतील खुरावले आदिवासी वाडीतील सहा कुटुंबांनीही आपले राहते घर पाडून त्याठिकाणी मंजूर घरकुलांतर्गत बांधकामाला सुरुवात केली. मात्र ग्रामसेवकाने संबंधित कुटुंबांना तांत्रिक अडचणीचे कारण देत घरकुलाच्या कामाचे बिल थांबविल्याने या कुटुंबांवर पावसाच्या तोंडावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
बिल न मिळाल्याने घरकुल बांधकाम थांबविल्यामुळे खुरावले आदिवासी वाडीतील गीता गणपत वाघमारे, लता मंगेश वाघेरे, गुलाब सुनील वाघमारे, आशा शिवराम हिलम, नथू लहू पवार, दिपाली रवी पवार ही सहा आदिवासी कुटुंब हवालदिल झाली आहेत. आमच्यावर होणारा अन्याय दूर करून आमच्या हक्काचे छप्पर आम्हाला मिळवून द्यावे व आमच्या मुलाबाळांचे रक्षण करावे, अशी भावनिक साद या कुटुंबांनी घातली आहे.
चिवे ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या खुरावले आदिवासी त्रवाडी येथे कित्येक पिढ्यान पिढ्या ही सहा कुटुंब राहत आहेत. त्यांचे कारवीच्या काड्यांच्या पडक्या घरात वास्तव्य होते. त्यांनी घरकुल मिळावे म्हणून अर्ज केल्यावर शासकीय यंत्रणेकडून सर्व्हे होऊन त्यांना २०२४-२५ मध्ये घरकुल मंजूर झाले. घरकुल मंजूर झाल्याने ग्रामसेवकांनी त्यांना घर पाडून घरकुल बांधण्याची परवानगी दिली.
त्यामुळे त्यांनी आपली झोपडी पाडून घरकुलाची पायाभरणीही केली. घरकुलाचा पहिला हप्ताही मिळाला; त्यानंतर त्यांनी पुढील कामही सुरू केले. मात्र अचानक ग्रामसेवकाने स्थानिक तक्रार आल्याचे सांगून घरकुलाच्या कामाची बिले थांबविली. त्यामुळे या आदिवासी बांधवांना अवकाळी पावसाचा उघड्यावर सामना करावा लागला.
अवकाळी पावसात वन्यजीवांच्या दहशतीखाली संसार
तांत्रिक कारण देत बिल न काढल्याने घरकुलांची कामे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे या सहा आदिवासी कुटुंबातील सदस्यांना राहण्याची अन्य कुठलीही सोय नसल्याने त्यांना मुलाबाळांसहित उघड्यावर राहून गुजराण करावी लागत आहे.
गेले चार-पाच दिवस तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. विजांच्या कडकडाटाचा सामना करीत विषारी वन्यजीवांपासून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याने ते दहशतीखाली जीवन जगत आहेत.
घरकुल मंजूर झाल्याने आम्हाला आमची झोपडी ग्रामसेवकाने तोडण्यास सांगितली. पायाभरणी झाल्यावर पहिला हप्ताही मिळाला. त्यानंतर तक्रार अर्ज आल्याचे कारण देत घरकुलाचा हप्ता बँकेत जमा झाल्यावरही त्यांनी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बिल न दिल्याने काम बंद करण्यात आले. सध्या आमच्या कुटुंबाला निवारा नसल्याने जंगल पट्टयात उघड्यावर जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. घरकुलाची पूर्ण रक्कम देऊन आम्हाला घरकुल पूर्ण करुन द्यावे; अन्यथा ऐन पावसाळ्यात आमच्या कुटुंबातील सदस्यांचे काही बरे वाईट झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल. - गीता गणपत वाघमारे, लाभार्थी, खुरावले आदिवासी