अवकाळी वादळी पावसामुळे लग्न मंडपाची दैना , लग्नाच्या मांडवात धावाधाव

मंडप, डेकोरेशन व्यावसायिक हवालदिल

By Raigad Times    17-May-2025
Total Views |
pali
 
सुधागड-पाली | सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. मात्र या लग्नाकार्यात अवकाळी वादळी पावसाचे विघ्न येत आहे. ऐन उन्हाळ्यात सातत्याने पडणार्‍या मुसळधार अवकाळी पावसामुळे लग्नघरात गोंधळ होत आहे. अचानक येणार्‍या या अवकाळी वादळी पावसामुळे लग्न मंडपाची दैना उडत असून वर्‍हाडी मंडळींची धावाधाव होतांना दिसत आहे.
 
शिवाय मंडप व डेकोरेशन व्यावसायिकांचे साहित्य भिजून खराब झाले आहे. तसेच आगाऊ बुकिंग रद्द झाल्याने नुकसान होत आहे. यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच अवकाळी पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. शेती, आंबा बागायतदार यांचे तर नुकसान झालेच पण त्या बरोबर अनेक घरांचे देखील नुकसान झाले आहे. शिवाय याचा फटका मंडप व डेकोरेशन व्यवसायिकांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे.
 
डेकोरेशन, विद्युत रोषणाई व मांडवाचे साहित्य भिजले. तसेच डीजे व्यावसायिकांचे इलेट्रॉनिक सामान भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. आता अवकाळी पाऊस कधीपण येईल यामुळे अनेकजण मांडव व डीजेच्या ऑर्डर रद्द करत आहेत. तर काहीजण आटोपशीर छोटा मांडव घालत आहेत.
हॉल व्यावसायिक सुखावले
ग्रामीण भागात प्रामुख्याने घरासमोर मांडवात किंवा समाज मंदिरात लग्न होतात. शहरात जरी हॉल मध्ये लग्न झाले तरी नवरा व नवरीच्या दारासमोर मांडव घातलाच जातो. हळद, वरात अ असे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अनेक विधी व कार्यक्रम मांडवातच केले जातात. मात्र अवकाळी पावसामुळे आता थेट हॉलमध्ये हे सर्व विधी करण्यास सुरुवात झाली आहे.
 
 
pali
 
किंवा हे विधी आटोपशीर केले जातात, आणि त्यामुळेच अवकाळी पावसाचा फटका बसू नये यासाठी आवर्जून लग्न हे हॉलमध्येच करण्याचा अनेकांनी निर्णय घेतला आहे. आणि याचा फायदा हॉल व्यवसायिकांना मिळाला असून अनेक हॉल आता बुक झाले आहेत. तसेच हॉल मिळण्यास आता अडचणी येत आहेत.
अवकाळी वादळी पावसामुळे व्यवसायाला फटका बसला आहे. १४ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मंडपाचा कपडा फाटला, मॅट व कार्पेट खराब झाले आहे. तसेच विद्युत उपकरणे देखील भिजली आहेत. यामुळे खूप नुकसान झाले आहे. अजून ऑर्डर रद्द झाल्या नाहीत, पण सततच्या अवकाळी पावसामुळे काही ऑर्डर रद्द होण्याची भीती वाटते. ऐन हंगामात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. आमच्या नुकसान भरपाईची शासन दरबारी कोणतीही तरतूद नाही. -सखाराम साजेकर, मंडप व्यावसायिक, मढाळी, सुधागड