बांगलादेशींना बनावट पासपोर्ट, जन्म दाखले बनवून देणारे दोघे गजाआड

By Raigad Times    17-May-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पनवेलमधील करंजाडे येथे केलेल्या कारवाई ध्ये ५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. या बांगलादेशींना पनवेलमधील मोहम्मद इस्माईल अमिन्नोदीन येऊलकर (५२) याने कर्नाटक राज्यातील ईस्माइल शेख याच्यामार्फत बनावट पासपोर्ट आणि जन्मदाखले बनवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
 
गुन्हे शाखेने ईस्माइल शेख आणि येऊलकर या दोघांना अटक केली आहे. तसेच न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढलेल्या आणखी २ बांगलादेशींनाही भाईंदर येथून अटक केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ५ मे रोजी पनवेलमधील करंजाडे भागातील इमारतीवर छापा मारुन त्याठिकाणी राहर्णा?या ३ महिला आणि २ पुरुष अशा ५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती.
 
तपासात या सर्वांनी भारतीय नागरिकत्वाचे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड तसेच पासपोर्ट बनवून घेतल्याचे आढळून आले होते. त्यांना मोहम्मद इस्माईल अमिन्नोदीन येऊलकर याने भारतीय कागदपत्र बनवण्याकरिता आणि भारतात वास्तव्य करण्यासाठी मदत केल्याचे तपासात आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात येऊलकर याला सहआरोपी करुन त्याला अटक केली.