पाली/बेणसे | उन्हाचा तडाखा सर्वत्रच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुया चार्याचा देखिल अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे. मग ही मोकाट गुरे पालीत डम्पिंग ग्राऊंड व उकिरड्यावर जावून मिळेल ते खात आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोयात आले आहे.
शिवाय स्वच्छतेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. येथील डम्पिंग ग्राऊंडवर तसेच जुने पोलीस स्थानक, मधली आळी, बल्लाळेेशर मंदिर, बल्लाळेेशर नगर व मराठी शाळा आदी ठिकाणी उकिरड्यावर सकाळ पासूनच मुकाट गुरांची गर्दी असते. येथे टाकलेला कचरा ही गुरे अस्ताव्यस्त करतात त्यामुळे येथे घाण व दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोयात येते.
बर्याचवेळा टाकून दिलेले अन्न पदार्थ पिशव्यांमध्ये असते. परिणामी गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लास्टिक जाते. प्लास्टिक व सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यांची पचनशक्ती मंदावते, अन्नाच्या शोधात सतत चालल्याने त्यांची ऊर्जा कमी होते. अशक्तपणा येतो. डम्पिंग ग्राऊंड व उकिरड्यावरील कचर्यात धातू तसेच अनुकुचिदार वस्तू उदा. घरगुती वापराच्या वस्तू, काचेच्या वस्तू व इंजेशनच्या सुया आदी घटक असतात.
त्या पोटात गेल्यामुळे जनावरांच्या जठराला व अन्ननलिकेला इजा पोहचते. सतत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते त्यांच्या पोटात साठते. त्यामुळे गुरे मरतात देखील. काही वेळेस अशा मेलेल्या गुरांची हाडे इतर गुरे आणि प्राणी चघळतात व पर्यायाने त्यामुळे त्यांचा देखिल मृत्यू होतो आणि हे दुष्टचक्र सुरूच राहते.
चारा पाण्याची व्यवस्था करावी
उष्म्याने जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी किंवा गुरेपालक यांनी आपली गुरे चरण्यासाठी मोकाट सोडू नयेत. शासनाने मोकाट गुरांच्या चारा पाण्याची व्यवस्था केली पाहिजे.
किंवा पशुपालकांना यासाठी अनुदान दिले पाहिजे. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा. जेणेकरून गुरे तेथे येणार नाहीत.