ढगाळ वातावरण, प्रचंड उष्म्यामुळे श्रीवर्धनमधील स्थानिक नागरिक हैराण

17 May 2025 17:27:10
shreewardhan
 
श्रीवर्धन | सतत बदलत असलेले हवामान, कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. वास्तविक पाहता श्रीवर्धन मधील तापमान ३२ किंवा ३३ अंश सेल्सिअस इतकेच असते. परंतु हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढल्यामुळे हे तापमान ३८ ते ४० सेल्सिअस असल्याचे जाणवते. प्रचंड उष्म्यामुळे या ठिकाणचे स्थानिक नागरिक हैराण झाले असून, घामाने अक्षरशः अंघोळ होत आहे.
 
तापमानात होत असलेल्या सततच्या बदलामुळे तापाच्या साथी देखील श्रीवर्धन तालुयात पसरलेल्या पाहायला मिळत आहेत. शासकीय रुग्णालयाशिवाय, खाजगी रुग्णालयांमध्ये व दवाखान्यांमध्ये देखील व्हायरल ताप येत असलेले अनेक रुग्ण आढळत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये अनेकांना पेशी वाढणे, पेशी कमी होणे, डोके दुखणे, मळमळ होणे, अशा प्रकारचे त्रास जाणवत आहेत.
 
मे महिना म्हटला की शाळांना सुट्ट्या असतात. या काळामध्ये श्रीवर्धन सारख्या पर्यटकांच्या आवडीच्या ठिकाणी अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक पुणे जिल्ह्यातून व शहरातून येत असतात. मात्र मागील आठ दिवसांपासून येणार्‍या पर्यटकांना ताम्हिणी घाट, माणगाव, मोरबा या परिसरात पाऊस पडताना दिसत आहे. श्रीवर्धनमध्ये फक्त एक दिवशी तुरळक प्रमाणात पाऊस झाला होता.
 
त्यानंतर वातावरण रोज ढगाळ होत असले तरी या ठिकाणी पाऊस पडलेला नाही. मात्र तुरळक झालेल्या पावसामुळे देखील आंबा बागायतदारांचे व वीट भट्टी मालकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माणगाव परिसरात पाऊस तर श्रीवर्धन परिसरात आल्यानंतर प्रचंड उष्मा जाणत असल्याने पर्यटकांकडून वातानुकूलित खोल्यांची मागणी सर्व हॉटेल मालकांकडे केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यावर्षी मौसमी पावसाचे आगमन लवकर होईल. असे जाणकारांमधून बोलले जात आहे. कारण मागील चार दिवसांपासून समुद्राचे पाणी देखील काही प्रमाणात खवळले असल्याचे पाहायला मिळत आहे.
Powered By Sangraha 9.0