कर्जतमध्ये सापडला धेनुगळ हा फार दुर्मिळ शिलालेख

By Raigad Times    17-May-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | कर्जत हे केवळ निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ नसून ते एक समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण आहे. या परिसरात अनेक किल्ले, लेण्या, घाटवाटा तसेच शतकानुशतकांचा इतिहास साठवून ठेवणार्‍या वास्तू आढळतात. कर्जत मध्ये कायम भटकंती करणार्‍या एका समूहाला अशीच एक ऐतिहासिक गोष्ट सापडली आणि ती म्हणजे धेनुगळ शिलालेख.
 
कर्जतच्या गावागावांमध्ये विखुरलेल्या विरगळी, बारव विहिरी, तसेच जुन्या समाध्या, हे सर्व इथल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जिवंत दाखले आहेत. कर्जतमधील कायम भटकंती करणार्‍या अभिजीत मराठे, कौस्तुभ परांजपे, शर्वरीष वैद्य, रिनेश सोनावळे आणि मंदार लेले या समूहाला अशीच एक ऐतिहासिक गोष्ट सापडली आणि ती म्हणजे धेनुगळ. त्यातच धेनूगळ म्हणजे गाय वासरु दगड हे एक दानपत्र आहे.
 
दान दिलेल्या गावाची, जमिनीची सीमा दाखवण्यासाठी धेनूगळ वापरला जात असे. या आयताकृती उभ्या दगडावर गाय आणि वासरू कोरलेले असते. वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात. गाय हे राजाचे प्रतिक असून वासरू हे प्रजेचे प्रतिक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो. या गाय वासरू दगडांवर काही ठिकाणी शिलालेखही कोरलेले पाहायला मिळतात. धेनुगळ ही फार दुर्मिळ असून मोजयाच ठिकाणी पहायला मिळते. कुसूर घाट हा ट्रेक करताना ही शिळा पहायला मिळाली. कुसूर घाटाच्या जंगलात धेनूगळ सापडली. या धेनुगळीचा हे ट्रेकर्स अजून अभ्यास करणार आहेत.