अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश मिळावेत , आ.महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन

कर्जत उपविभाग खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

By Raigad Times    16-May-2025
Total Views |
KARJT
 
कर्जत | कर्जत आणि खालापूर तालुयात शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन होत नाही हे दुर्दैव असून, पाच वर्षात असे मंच उभे राहिले नाही, ही बाब गंभीर असून कृषी संशोधन केंद्रामधील तुमची नियुक्ती कशासाठी आहे? याचा जाब विचारला जाईल, असे कृषी संशोधन केंद्राला ठणकावून सांगत आमदार महेंद्र थोरवे यांनी हमी भावाने भाताची विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना त्याचा मोबदला मिळत नाही ही भूमिका अतिशय चुकीची असल्याचा आरोप थोरवे यांनी केला.
 
कर्जत उपविभाग खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये आमदार थोरवे यांनी कर्जत तालुका कृषी पर्यटन तालुका जाहीर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे देखील यावेळी जाहीर केले. कर्जत उपविभाग खरीप आढावा बैठकीचे आयोजन भात संशोधन केंद्रात केले होते.
 
आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीला प्रांत अधिकारी प्रकाश संकपाल, खालापूर तालुयाचे तहसीलदार अभय चव्हाण, उप विभागीय कृषी अधिकारी निंबाळकर, सहायक निबंधक संस्था शिवाजी घुले, निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड, कृषी संशोधन केंद्राचे डॉ गवई, कर्जत पंचायत समिती अतिरिक्त गटविकास अधिकारी बोरकर तसेच तालुका कृषी अधिकारी शिंदे, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी, किरण गंगावणे, भात खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष काशिनाथ ठमके, आत्माचे सदस्य चंद्रकांत मांडे, नैसर्गिक शेती शेतकरी रवींद्र झांजे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
खरीप हंगाम आढावा बैठकीत उप विभागीय कृषी अधिकारी सुनील निंबाळकर यांनी प्रास्ताविक करताना खरीप हंगामाची सुरुवात असताना आपली उत्पन्न भरपूर आहे, पण उत्पादकता वाण करण्यात आपण कमी आहेत. तर कृषी अधिकारी शिंदे यांनी तालुयाचा खरीप आढावा या बैठकीत मांडला. प्रगत शेतकरी शशिकांत मोहिते, चंद्रकांत मांडे यांनी आपली मनोगत मांडली. राज्याचे पर्यटन धोरण ठरविले जात असताना कर्जत तालुका पर्यटन तालुका व्हावा आणि कृषी पर्यटन तालुका व्हावा यासाठी प्रयत्न आम्ही करीत आहोत. कृषी पर्यटनाचे माध्यमातून शेतकरी जगला पाहिजे यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जाहीर केले.
भात संशोधन केंद्र सपशेल अपयशी
कोकण कृषी विद्यापीठाचे कर्जत येथील भात संशोधन केंद्र शासन चालवते आणि या ठिकाणी शास्त्रज्ञ शेतकरी मंच स्थापन करीत नाहीत. पाच वर्षे तुम्ही मंच स्थापन करू शकले नाही आणि या ठिकाणी माझी सूचना मागील वर्षी असून देखील तुम्ही अंमलबजावणी करणार नसाल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी बसू देणार नाही, असा इशारा आमदार थोरवे यांनी कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ यांना केला. प्रगतशील शेतकरी मंच यांना पाठबळ द्या अशी सूचना करून गावोगावी ग्रामपंचायतींमध्ये या योजना राबवून त्यांना शेती क्षेत्र कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे अशी सूचना केली.
आपल्याच तालुयात कृषी संशोधन केंद्राचे माध्यमातून तत्काळ उपाययोजना करता येत असल्याचा मोठा फायदा होत असतो. मात्र दुसरीकडे आता शेती करणे सर्वात कठीण होऊन बसले आहे आणि त्यामुळे भविष्यात शेती राहील की नाही? अशी भीती निर्माण झाली असून आमच्या तालुयात शेती राहणार आहे किंवा नाही. त्यामुळे शासनाच्या योजना या लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. आता तरुण शेतकरी पुढे येत असून शेतकर्‍यांना चांगली वाण मिळाली पाहिजेत आणि शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही याची काळजी अधिकारी वर्गाने घ्यावी. -प्रकाश संकपाल, प्रांत अधिकारी