कार्बन कंपनीतील दूषित सांडपाणी शेतात , तळवली लोहप गावातील शेतीचे नुकसान; शेतकरी आक्रमक

By Raigad Times    16-May-2025
Total Views |
 KHOPOLI
 
खोपोली | आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतील काळ्या धुराच्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त असतानाच कंपनीने दूषित सांडपाणी वेगवेगळ्या शेतांमध्ये सोडल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेती नापीक होण्याच्या भितीने शेतकरी आक्रामक झाले आहे.
 
कारखाना व्यवस्थापनाने दूषित सांडपाण्याची व्यवस्था करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी भरत पाटील यांनी शेतकर्‍यांची वतीने केली आहे. खालापूर तालुयातील लोहप व तळवली हद्दीत आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कारखाना मागील १५ वर्षांपासून आहे. कारखाना सुरू झाल्यापासून काळ्या कार्बन मुळे येथील नागरिक त्रस्त आहेत याबाबत ही कोणताही मार्ग काढला नाही.
 
कारखान्यात उत्पादन प्रक्रिया झाल्यानंतर दूषित पाणी वेगवेगळ्या मार्गाने सोडण्याचा घाट घातल्याने येथील शेती नापीक झाली आहे. या भयानक घटनेनंतर शेतकरी भरत पाटील यांनी कंपनीविरोधात वारंवार आवाज उठविल्यानंतर तात्पुरते समज काढण्याचा प्रयत्न करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आजतागायत दूषित पाण्याचा ठोस उपाययोजना न करता आता तर थेट शासनाने शेती व्यवसायाला पूरक व्हावा यासाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी तयार केलेल्या पाण्याच्या काळव्यातच पाणी सोडल्याने कारखाना व्यवस्थापन हम बोलो सो कायदा या प्रमाणे वागत असल्याने शेतकरी वर्ग आक्रमक झाल्याने या करखान्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे या घटनेबाबत व्यवस्थापनाकडून बाजू समजून घेण्यासाठी दूरध्वनीद्वारे प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
खालापूर तालुयात सर्वात जास्त प्रदूषण करणारा कारखाना बिर्ला हायटेक कार्बन कारखाना आहे. या कारखान्यात कार्बन उत्पादन प्रक्रिया करताना फरनेस ऑइल, टायर यासह अन्य कच्चा माल वापरला जात असल्याने परिसराला काळ्या धुराने हैराण केले असताना या कारखान्यातील प्रदूषण करणारे पाणी येथील शासनाने शेतकर्‍यांच्या भातपिकांसाठी उपयुक्त ठरणार्‍या पाण्याच्या कालव्यात दूषित पाणी सोडल्याने शेतकरी वर्ग शेती नापीक झाल्याने संकटात सापडला, याकडे प्रशासनाने गांभीर्याने बघून कारखान्याचे दूषित पाणी बंद करावे व त्याचे नियोजन करावे अशी मागणी आहे. -भरत पाटील, नुकसानग्रस्त शेतकरी