धाटाव | रोहा तालुयातील तांबडी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. हा खटला माणगाव कोर्टात चालला, ८ मे रोजी निकाल जाहीर झाला, मात्र सर्व आरोपी निर्दोष सुटले. कोर्टाने दिलेला निर्णय दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त करत रोह्यातील शेकडो महिलांसह नागरिकांनी मंगळवारी (१३ मे) पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी राम मारुती चौक ते तहसीलदार कार्यालय असा जनआक्रोश मोर्चा काढत संतापाला वाट करुन दिली.
महिलांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी ज्ञानेेशर खुटवड यांना दिले. यावेळी आरोपीला फाशी द्या, आम्हाला न्याय द्या , अशा घोषणा देत महिलांनी हंबरडा फोडला. या मोर्चात सर्व समाज बांधव व विविध राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. पीडित मुलीला न्याय लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात आला. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी सरकार तर्फे बाजू मांडली. मात्र या खटल्याच्या निकालाने पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह रोहेकरांना मोठा धक्का बसला.
या प्रकरणात सक्षम यंत्रणेची नव्याने नियुक्ती करुन पुन्हा चौकशी करावी आणि त्या मुलीला न्याय देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात यावा, तसेच उच्च न्यायालयात प्रकरण चालवण्यासाठी सक्षम सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी, या प्रकरणात काही अपुरे पुरावे असल्यास ते पुरावे गोळा करण्यासाठी एसआयटी व अन्य विशेष सक्षम यंत्रणा स्थापन करावी. या गुन्ह्यात तपास योग्य करण्यात आला आहे की नाही, यासाठी विशेष कमिटीची स्थापना करून या गुन्ह्याच्या तपास यंत्रणेतील अधिकार्यांची चौकशी करावी व दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.