म्हसळा | तालुयातील अती दुर्गम भागातील कोळवट येथील ग्रामस्थांवर गाव मंदिरात मधमाशांनी हल्ला करण्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजताचे दरम्यान घडली आहे. मधमाशांच्या हल्यात गावातील ४२ ग्रामस्थ जखमी झाले. जखमीमध्ये एक गतीमंद तर एक वयोवृद्ध आणि १३ बालकांचा समावेश आहे. कोळवट ग्रामस्थ दर सोमवारी मंदिरात सकाळी महाआरतीसाठी जातात.
नेहमीप्रमाणे माहे मे महिन्यात महापूजेचे आयोजन करण्यात येते. सुट्टीकालीन स्थानिक आणि मुंबई निवासी ग्रामस्थ महापूजेची पूर्वतयारी आणि आरतीकरिता गाव मंदिरात बहुसंख्येने आरती करण्यासाठी गेले होते. पूजा आरती सुरू असतानाच अचानक मधमाशांनी मंदिरात प्रवेश करत उपस्थित लहान थोर वयोवृद्ध यांच्यावर हल्ला करून ४२ जणांना जखमी केले आहे.
जखमीमध्ये गतीमंद रुग्ण सखाराम भुवड, वय वर्ष ६५ वर्षे आणि वयोवृद्ध व्यक्ती लक्ष्मण बोर्ले, वय वर्ष ८० यांना अधिक त्रास होऊ लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच म्हसळा ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने सर्व जखमींना तातडीने १०८ रुग्ण वाहिकेमधून उपचारासाठी आणण्यात आले. म्हसळा ग्रामीण रुग्णालय व म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉटर व कर्मचार्यांनी तसेच १०८ रुग्णवाहिका प्रशासनाने घडलेल्या घटनेत तत्परता दाखवल्याने ग्रामस्थानकडून त्यांना धन्यवाद देऊन त्यांच्या वैद्यकीय सेवेचे कौतुक केले आहे.