सुधागडमध्ये मॉकड्रिलद्वारे सुरक्षा यंत्रणेची चाचणी यशस्वी

12 May 2025 17:21:48
 pali
 
सुधागड-पाली | पालीतील अष्टविनायक क्षेत्र असलेल्या बल्लाळेेशर मंदिर परिसरात १० मार्च रोजी सकाळी १० ते ११ वाजता अतिरेकी हल्ल्याच्या परिस्थितीचा अनुभव देण्यासाठी मॉकड्रिल आयोजित करण्यात आले. या सरावाच्या माध्यमातून आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था, नागरिकांचे रक्षण आणि जखमींच्या बचावासाठी आवश्यक उपाययोजना याची माहिती देण्यात आली.
 
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या हवाई हल्ल्याच्या पोर्शभूमीवर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार या सरावाचे आयोजन करण्यात आले. अतिरेकी हल्ल्याच्या वेळी नागरिकांनी कोणती सावधगिरी बाळगावी, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
 
सरावादरम्यान पोलीस, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. नागरी संरक्षण दल आणि आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी तातडीने हालचाली करत जखमी नागरिकांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे हलवले. या मॉकड्रिलमध्ये पोलीस प्रशासन, महसूल विभाग, वन विभाग, पाली नगरपंचायत, स्थानिक प्रशासन, प्रशासकीय अधिकारी तसेच सामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वागण्याच्या उपाययोजना प्रत्यक्षरित्या अनुभवता आल्या, ज्यामुळे भविष्यात अशा घटना घडल्यास प्रभावी प्रतिसाद देता येणार आहे.
Powered By Sangraha 9.0