आयशर टेम्पो चालकास पोलिसांनी पकडले , वैभव पालकरच्या अपघातास कारणीभूत असणार्‍या

By Raigad Times    12-May-2025
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर | पोलादपूर शहरातील आनंदनगर येथे राहणार्‍या वैभव पालकर यांचा ४ मे रोजी कामावरून घरी येत असताना सकाळी पावणेआठच्या सुमारास लोहारे गावच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. अज्ञात आयशर ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मात्र या अपघातानंतर आयशर चालक हा पसार झाला होता. त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
 
पोलादपूरसह रायगड जिल्ह्यात क्रिकेट क्षेत्रामध्ये सर्वप्रिय असणारा राजू याच्या मृत्यूने सर्वत्र प्रचंड हळहळ व संताप व्यक्त केला जात होता. या सर्व गोष्टींचा पोलीस यंत्रणेवर प्रचंड दबाव वाढत होता. मात्र पोलीस यंत्रणेकडून अपघातानंतर विविध पथके शोध मोहिमेसाठी पाठविण्यात आली. पोलादपूर पोलिसांनी या तपासात अथक मेहनत आणि परिश्रम घेत रायगड रत्नागिरी ठाणे सातारा हे जिल्हे गाठून सीसीटीव्ही फुटेज तपासले.
 
या अपघाताबाबत पालकर यांच्या परिवाराची मंत्री नामदार गोगावले यांनी भेट घेऊन सांत्वन करत पोलीस यंत्रणेला तातडीने आरोपी व गाडीचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तपास चक्रे वेगाने फिरली पोलीस यंत्रणेने हायटेक टेनॉलॉजीचा वापर करत अहोरात्र मेहनत घेऊन कोलाड ते खेड पट्ट्यातील रस्त्यालगत शेकडो सीसीटीव्ही फुटेज पोलीस टीम व पालकर परिवाराचे हितचिंतक यांच्या माध्यमातून प्राप्त केले.
 
त्या आधारे अपघातास कारणीभूत गाडीचा शोध लावण्यात यशस्वी ठरले. सीसीटीव्ही फुटेज पाहता अतिशय बेजबाबदारपणे आयशर टेम्पो आरोपीकडून चालविण्यात आल्याचे वास्तव समोर आले. सदर अपघातातील आयशर टेम्पो मालकाचे लोकेशन मालेगाव येथे ट्रेस झाल्यानंतर पोलीस पथक सदर ठिकाणी रवाना होत असताना सदर गाडीचा सुगावा खेड येथे लागल्यानंतर पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रावडे यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड एसपी यांच्या अधिपत्याखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलीस उप निरीक्षक पवार, सहाय्यक हवालदार भुजबळ यांना दिलेल्या सूचनानुसार खेड ते माणगाव सर्व पोलीस यंत्रणा अलर्ट करण्यात आली.
 
खेडवरून निघालेली गाडी पोलादपूर येथील पोलीस हवालदार तुषार सुतार यांच्या निदर्शनास येताच पाठलाग करून जुना टोल नाका येथे गाडी व आरोपी चालक यावा लीनरसह पोलादपूर पोलीस स्थानकात हजर करण्यात आले. सुरुवातीला सदर अपघाताबाबत उडवाउडवी करणारा चालक यांनी पोलिसी खाया दाखवताच पोपटासारखे सर्व पोलिसांसमोर कबूल केल्याचे समजते. सध्या अपघातात कारणीभूत आयशर टेम्पो सह आरोपी चालक व साथीदार असे पोलिसांच्या ताब्यात चौकशीसाठी घेण्यात आले आहेत.