कृषी सहाय्यकांचे प्रलंबित न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन

By Raigad Times    10-May-2025
Total Views |
 roha
 
खारी/रोहा | महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना संलग्न रोहा तालुका शाखेच्या माध्यमातून कृषी सहाय्यक संघटनेच्या कार्यकारी पदाधिकारी वर्गाने उपविभागीय कृषी अधिकारी शुभम बोराडे आणि रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांना आपल्या प्रलंबित विविध न्याय हक्काच्या मागण्यांसाठीचे निवेदनाद्वारे ५ मेपासून ते १५ मेपर्यंत विविध स्तरावर आंदोलन पुकारल्याचे नमूद केले आहे.
 
महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या नेतृत्वाने राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील १० फेबु्रवारी रोजीच्या बैठकीत कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या विविध मागण्यांची येत्या १५ दिवसांत पूर्तता करण्यात येईल असे आश्वासित केले असताना अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने नाईलाजास्तव महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या झेंड्याखाली दि. ५ ते लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसले असून १५ मे पर्यंत विविध स्तरावर आंदोलन करण्यात येणार आहे.
 
यामध्ये प्रामुख्याने कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती, पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे, यांसह विविध न्याय हक्काच्या मागण्यांसाठीचे निवेदनामध्ये अन्य महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी माणगाव उपविभागीय कृषी अधिकारी शुभम बोराडे आणि रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांना निवेदन देताना रोहा तालुकाध्यक्ष गणेश लोंढे, आदींसह मोठ्या संख्येने कृषी सहाय्यक संघटनेचे कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते.