शेकाप नेते जे.एम.म्हात्रे यांचा मविआला राम राम! अल्टिमेटमनंतरही शेकाप बाहेर न पडल्याने नाराजी

30 Apr 2025 17:57:11
panvel
 
पनवेल | शेकापचे नेते जे. एम म्हात्रे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पक्षाला इतकेदिवस अल्टीमेटम देऊनही निर्णय न घेतल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र आपण यापुढे मविआ बरोबर काम करू शकत नाही असे त्यांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे शेकाप नेतृत्वासमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे.
 
महाविकास आघाडी असतानाही रायगड जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष वेगळे लढले. त्यांचे एकमत न झाल्याने इंडिया आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. जर उरणमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर त्या ठिकाणी नक्कीच विजय मिळवला असता हि सल शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निवडणुकीच्या निकालापासून कायम आहे. विधानसभेला आघाडीत बिघाडी झाल्यामुळे त्याचा फायदा महायुतीला झाला.
 
उरणमध्ये अत्यंत कमी फरकाने म्हात्रे यांचा पराभव झाला. त्यामुळे विशेष ठाकरे गटाविरोधात खदखद सुरू आहे. यानंतर महाविकास आघाडीतून शेतकरी कामगार पक्षाने बाहेर पडावे आणि स्वतंत्रपणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवाव्यात अशा प्रकारची भूमिका माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे आणि त्यांचे चिरंजीव प्रीतम म्हात्रे यांनी घेतली. त्यांनी पक्ष नेतृत्वाला याबाबत अल्टीमेटमसुद्धा दिले.
 
परंतु याविषयी पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. पनवेल उरणचे वजनदार नेते जे. एम. म्हात्रे हा कोणता निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवारी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. यामध्ये म्हात्रे यांनी आपली भूमिका विशद करीत यापुढे महाविकास आघाडीमध्ये काम करण्यात कोणताही रस नसल्याचे स्पष्ट केले.
 
लोकसभेला शेकापने प्रामाणिक काम केले. विधानसभेत ताकत असतानाही आम्हाला जागा सोडल्या गेल्या नाहीत याउलट मविआतूनच उमेदवार उभे करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून निवडणूक कशी लढवणार असा सवाल जे.एम. म्हात्रे यांनी उपस्थित केल्याचे समजते. महाविकास आघाडीतून लागलीच बाहेर पडता येणार नाही. याकरता काही वेळ लागेल अशा शब्दात माजी आमदार बाळाराम पाटील यांनी म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु म्हात्रे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले. त्यामुळे साहजिकच त्याचा तिसर्‍याला फायदा झाला. अनेक वर्षांपासून माझे वडील या पक्षात काम करीत आहेत. मात्र महाविकास आघाडीतून एक्झिट घेण्याबाबत ठोस भूमिका न घेतल्यामुळे त्यांनी यापुढे आघाडी बरोबर काम न करण्याची भूमिका घेतली. मात्र इतर कुठल्या पक्षासोबत जाण्याचा अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. - प्रीतम म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका
Powered By Sangraha 9.0