१ मे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणावरुन मानापमान , झेंडावंदनाचा मान अदिती तटकरेंकडे;भरत गोगावले समर्थक भडकले

30 Apr 2025 12:46:08
 mumbai
 
महाड | १ मे महाराष्ट्र दिनी रायगडच्या मुख्यालयात होणार्‍या झेंडावंदनाचा मान पुन्हा एकदा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोघांकडेही मंत्रीपद असताना दोघांना समान संधी देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती.
 
यामध्ये रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना देण्यात आले होते. शिवसेना आमदार भरत गोगावले आणि शिवसेना आमदारांनी या नियुक्तीला जोरदार विरोध दर्शवला होता. भरत गोगावले यांचे समर्थक रस्त्यावर उतरले होते. परिणामी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली होती. अवघ्या आठ दिवसांवर असलेल्या प्रजासत्ताक दिनी रायगडच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्याचा मान तेव्हा अदिती तटकरे यांना मिळाला होता.
 
त्यानंतर अजूनही रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. मंत्री भरत गोगावले आपली इच्छा अधूनमधून बोलून दाखवत असतात. तर तटकरे यांनीही पालकमंत्रीपद प्रतिष्ठेचा मुद्दा केलेला आहे. हा तिढा कायम असतानाच, आता महाराष्ट्र दिनाच्या झेंडावंदनवरुन या दोन मित्रपक्षांमध्ये वातावरण तापलेले दिसत आहे.
 
महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरे यांना मिळाल्याने रायगडचे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडीक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांनाच मिळाला पाहिजे, अशी मागणी रायगडचे शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडीक यांनी केली आहे जिल्ह्यात भरत गोगावले आणि अदिती तटकरे या दोघांकडेही मंत्रीपद आहेत. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याच्या मान अदिती यांना मिळाला आहे. आता महाराष्ट्र दिनी तो मान भरतशेठ यांचा आहे. तसे न झाल्यास पुढे जे घडेल त्याला जबाबदार आम्ही नसू, असा इशाराही दिला आहे.
जनतेने आम्हाला जनाधार दिला आहे. संपूर्ण रायगडची इच्छा आहे की, पालकमंत्री भरतशेठच व्हायला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि रायगडच्या लोकांची भूमिका त्यांच्यापुढे मांडणार आहे. मला विश्वास आहे की, वरिष्ठ पातळीवरून भरत गोगावले यांना पालकमंत्री घोषित केले जाईल. तसेच यावेळी महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहणकरण्याची संधी भरतशेठ यांना मिळावी, अशी आमची मागणी आहे. - महेंद्र दळवी, आमदार, अलिबाग-मुरुड
Powered By Sangraha 9.0