बोर्लीपंचतन बसस्थानकामध्ये सुलभ शौचालयाची मागणी , स्थानिक पर्यटकांची होते गैरसोय

30 Apr 2025 19:57:27
 dighi
 
दिघी | बोर्लीपंचतन एसटी निवारा शेडचे विस्तारीकरण व्हावे यासाठी सातत्याने मागणी होत असताना बाजारपेठेतील गर्दी तसेच वाढत्या पर्यटकांसोबत महिला एसटी प्रवाशांची याठिकाणी शौचालयाची मागणी होत आहे. स्वच्छतागृहांअभावी परिसरातील नागरिकांची कुचंबणा होत आहे. गेली कित्येक वर्ष बोर्ली शहराला शौचालयाच्या समस्येने ग्रासले आहे.
 
येथे बाजारहट करण्यासाठी परिसरातील साधारण ४० गावांचा रोजचा संपर्क असून, तालुयातील पर्यटन आधारित बोर्लीपंचतन हे मध्यवर्ती ठिकाण आहे. यामुळे येथील राष्ट्रीय बँका, पोस्ट कार्यालय, महावितरण कार्यालय, शाळा, रुग्णालये, मासळी बाजार तसेच बसस्थानकातील दिवसागनिक पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गर्दीला बसस्थानकात मूलभूत सुविध मिळत नाही.
 
त्यामुळे येथे नागरी सुविधांची मागणी होत आहे. येथील सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने सुलभ शौचालय बांधण्यात यावे. त्यामुळे एकूणच शहरातील आरोग्याचाही प्रश्न सुटला जाईल. मात्र, कित्येकदा शौचविधीसाठी या ठिकाणी प्रतीक्षेत नागरिक असतात. बसस्थानक जवळच शौचालयासाठी जागाच नसल्याने या परिसरात कुठेतरी आडोशाला विधी आटोपला जातो, यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. परिसरात स्वच्छतागृहांअभावी नागरिकांची कुचंबणा होत आहे. असे विदारक वास्तव असून लोकांची विशेषत: महिलांची कुचंबणा थांबवण्यासाठी सबंधित प्रशासनाने सुसज्ज सर्व सोयीनींयुक्त शौचालय उभारण्यासाठी ठोस पाऊल उचलण्यात यावेत. अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
शहरांप्रमाणे बोर्लीपंचतन बसस्थानक परिसरात आधुनिक प्रकारचे सुलभ शौचालय लवकरच होईल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - तुषार लुंगे, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धन
नागरिकांच्या मागणीनुसार बोर्लीपंचतन ग्रामपंचायतकडून सुलभ शौचालयासाठी समन्वय साधला जाईल. - शंकर मयेकर, ग्रामसेवक, बोर्लीपंचतन
Powered By Sangraha 9.0