पहेलगाम हत्याकांड अमानवी आणि नृशंस , रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री ना.भरत गोगावले यांचे प्रतिपादन

29 Apr 2025 19:18:01
 mahad
 
महाड | पहेलगाम येथे अतिरेयांनी पर्यटकांचे केलेले हत्याकांड अमानवी आणि नृशंस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकासमंत्री ना. भरत गोगावले यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार या पाकिस्तान पुरस्कृत हत्याकांडाला करारा जबाब देत बदला घेईल असा ठाम विेशासही त्यांनी व्यक्त केला.
  
या दहशतवादी हल्ल्यात पनवेल येथील रहिवासी दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ना. भरत गोगावले यांनी गुरुवारी पनवेल येथे देसले परिवाराची भेट घेतली आणि सांत्वन केले. त्यानंतर महाडला आल्यानंतर त्यांनी या घटनेवर माध्यमांसमोर भाष्य केले. ज्या पद्धतीने अतिरेयांनी हे हत्याकांड केले त्याचे वर्णन अंगावर शहारे आणणारे आणि स्वत:ला भारतीय म्हणवणार्‍या प्रत्येक माणसाचे रक्त खवळायला लावणारे असेच आहे.
 
या हत्याकांडाचा बदला घेतला जावा ही प्रत्येक भारतीयाची भावना आहे, असे ना. गोगावले म्हणाले. यावेळेस उबाठा सेनेकडून घेतल्या जात असलेल्या भूमिकेवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. शिवसेना उबाठाकडून ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया किंवा विरोध केला जात आहे, त्याला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधाची कणमात्रही धार नसल्याचे ते म्हणाले.
 
जर उबाठा सेनेला या घटनेचे गांभीर्य समजले असते तर त्यांचे खासदार गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले असते असे सांगतानाच उबाठा केवळ राजकारण करत असल्याचा आरोप ना. गोगावले यांनी केला. आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दुर्दैवी घटनेनंतर ताबडतोब काश्मिरला गेले. महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे काम त्यांनी केले. एवढंच नव्हे तर येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबियाना आर्थिक मदत देखील केली.
Powered By Sangraha 9.0