पनवेल | पनवेल रेल्वे स्टेशन परिसर तसेच इतर विभाग परिसरातून मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यापासून दुचाकी वाहने चोरीस जाण्याचे प्रकार वाढले होते. या अंतर्गत गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल हे सदर चोरट्याचा शोध घेत असताना तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे सदर गुन्हेगार हा पळस्पे परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या पथकाने तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून आतापर्यंत ११ दुचाकी चोरीच्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पनवेल शहर पोलीस ठाणे, कामोठे पोलीस ठाणे, खांदेेशर पोलीस ठाणे अंतर्गत मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यापासून वाढले होते. या संदर्भात सपोआ गुन्हे शाखा अजयकुमार लांडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, सपोनि प्रवीण फडतरे, अजित कानगुडे, पोउपनि प्रताप देसाई, मानसिंग पाटील, माधव इंगळे, पोउपनि अभयसिंह शिंदे, पोउपनि माधव इंगळे, पोहवा रमेश शिंदे, आदींच्या पथकाने सदर इसमाचा शोध घेत असताना आदित्य ठाकूर (२२) हा पळस्पे परिसरात असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबूल दिली असून त्याने आतापर्यंत ११ दुचाकी चोरीची वाहने दिली आहेत.
प्रामुख्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यातील ७ वाहने, १ कामोठे पोलीस ठाणे, १ खांदेेशर पोलीस ठाणे, १ पेण पोलीस ठाणे, आदींचा समावेश आहे. या आरोपीच्या अटकेमुळे अजूनही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शयता वर्तविण्यात येत आहे.