नवी मुंबई | तळोजा भागात एका महिलेने तिच्या चार वर्षीय मुलीची उशीच्या सहाय्याने तोंड दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विवाहितेचे नाव सोनम अभिषेक केणी (३०) असे असून तिच्या मुलीचे नाव देव्यांशी केणी (४) असे आहे.
सोनम, पती अभिषेक केणी व मुलगी देव्यांशी यांच्यासोबत तळोजा फेज- १ मधील पेठाली गावात राहत होती. गुरुवारी दुपारी सोनमने जेवण केल्यानंतर ती बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेली होती. यावेळी तिचा पती बाहेर गेला होता. याच कालावधीत घरामध्ये मुलीसह असलेल्या सोनमने आपल्या मुलीची उशीच्या सहाय्याने तोंड दाबून तिची हत्या केली. त्यानंत तिनेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली.
सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सोनमच्या पतीने तिच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधला. मात्र, ती फोन उचलत नसल्याने त्याने घरी धाव घेतली. त्यानंतर त्याने बंद असलेली बेडरुम उघडून पाहिले असता, सोनम गळफास घेतलेल्या स्थितीत तर मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली.
त्यामुळे त्याने तत्काळ दोघींना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी दोघींना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही महिन्यांपूर्वी सोनम गरोदर असताना, तिच्या मुलीचा जन्मतःच मृत्यू झाला होता. त्यामुळे सोनम मानसिक तणावाखाली होती, अशी प्राथमिक चर्चा सुरु आहे.