नवी मुंबई | महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदार फर्मकडून १ लाख ८४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पनवेल भिंगारी येथील उपकार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंता अशा दोघांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत.
एमएसईडीसीएल कंपनीतर्फे मेसर्स पालकर फर्मला दोन सिव्हिलची कामे देण्यात आली होती. यातील मार्च २०२५ अखेरीस एका कामाच्या बिलाची रक्कम तक्रारदार यांच्या फर्मच्या खात्यावर जमा झाली होती तसेच उर्वरित दुसर्या कामासंदर्भात साईट व्हिजिट करून बिल तयार करून मंजूर करणे बाकी होते.
या बिलांसाठी उपकार्यकारी अभियंता, (स्थापत्य विभाग) संदीप आण्णासाहेब डावरे, आणि कनिष्ठ अभियंता प्रथमेश नवचंद्र चोगुले, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, भिंगारी यांनी दोन्ही बिलाच्या रकमेवर टक्केवारी प्रमाणे प्रत्येकी ९२ हजार असे एकूण १ लाख ८४ हजारांची मागणी केली होती. लाचेची मागणी केल्याप्रमाणे तक्रारदाराने पैसे देण्याची तयारी दर्शवली. आणि याबाबतची तक्रार केली होती.
तक्रारीची खात्री केल्यानंतर नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (२५ एप्रिल) सापळा रचला. या सापळ्यात हे दोन अधिकारी लाच स्विकारताना अलगद सापडले. महावितरण विभाग भिंगारी कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. यामुळे विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस नाईक विशाल अहिरे यांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.