विमला तलाव नव्हे, अपघाताचे खुले आमंत्रण? निकृष्ट काम, झोपलेले उरण नगरपालिकेचे अधिकारी

25 Apr 2025 18:27:23
 new mumbai
 
उरण | उरण नगरपालिका हद्दीतील विमला तलावाजवळच्या पिचिंगला पुन्हा एकदा भगदाड पडल्याने प्रशासनाच्या कामाच्या दर्जावर आणि हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेआहे. पदपथ कोसळण्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याने, "हे अपघात वाट पाहत आहेत का?” असा सवाल नागरिकांनी केला आहे.
 
देऊळवाडी रस्त्यालगत असलेल्या पिचिंगला पडलेले मोठे भगदाड सकाळी मॉर्निंग वॉक करणार्‍या नागरिकांच्या लक्षात आले. याच भागात काही दिवसांपूर्वी कठडा कोसळला होता, आणि त्या दुरुस्तीचं काम अजूनही सुरूच आहे. दुरुस्तीचं काम सुरू असतानाच पुन्हा भगदाड पडणे म्हणजे थेट ठेकेदाराचं पोषण आणि नगरपालिकेचा भ्रष्टाचार असा स्पष्ट संकेत आहे. "हे काम जनतेसाठी नाही, ठेकेदारासाठी सुरू आहे,” असा संतप्त सूर आता नागरिकांमध्ये उमटू लागला आहे.
 
विमला तलाव परिसरात वारंवार असे प्रकार घडत असूनही ना कोणतं राजकीय नेतृत्व पुढे येतं, ना नगरसेवक काही बोलत. "उरणमध्ये अपघात झाल्यावरच सगळे जागे होतात, त्याआधी जनतेच्या जीवाला किंमतच नाही,” उरणकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहणार्‍या एक दिवस धडा शिकवू, असा सूर नागरिकांमधून निघत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0