पेण येथील तरुणाचा मृत्यू, एकजण जखमी , पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात; दोन मित्रांना अज्ञात वाहनाची धडक

04 Dec 2025 21:24:53
 pen
 
पेण | पेणखोपोली मार्गावरील अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नसून रविवारी (२ डिसेंबर) रात्री पुन्हा एकदा भीषण अपघाताने परिसर हादरला. रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास आंबेघर पेट्रोल पंपाजवळील हॉटेल टिक्का समोर वेगाने धावणार्‍या अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
 
आंबेघर बाजूकडून पेणच्या दिशेने जाणारी ज्युपिटर दुचाकी हॉटेल टिक्का समोर येताच पेण शहराच्या दिशेने येणार्‍या अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत बाईकस्वार राज वसंत पवार (वय २३, रा. गांगळआळी, पेण) हा गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
 
तर राजसोबत असलेला त्याचा मित्र करण चंद्रहास प्रसाद (रा. वडगाव) याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत जखम झाली असून त्याला तातडीने पेण येथून एमजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे गेल्या काही दिवसांत या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून गणपतीवाडी येथील हॉटेल सौभाग्य इन समोरील दोन तरुणांच्या मृत्यूची घटना अद्याप ताजी असतानाच झालेल्या या अपघाताने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
 
स्थानिकांनी या मार्गावरील वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा पालन व रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली जात आहे. या अपघाताची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांना धडक देणार्‍या अज्ञात वाहनाचा शोध सुरु आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0