पनवेल महापालिकेसाठी उमेदवारांची झुंबड , शेवटच्या दिवशी तब्बल 371 उमेदवारी अर्ज दाखल

31 Dec 2025 12:45:53
 Panvel
 
पनवेल । पनवेल महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची अक्षरशः झुंबड उडाली. पनवेलमध्ये मंगळवारी शेवटच्या दिवशी तब्बल 371 उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रमुख राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे गुप्त ठेवल्याने एकाचवेळी ही गर्दी पहायला मिळाली.
 
पनवेल महापालिकेतील 78 जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रियेत मंगळवार (30 डिसेंबर) हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता. या दिवशी सहा वेगवेगळ्या प्रभाग समितींच्या निवडणूक कार्यालयांमध्ये विविध राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष मिळून एकूण 371 अर्ज दाखल झाले. त्यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची एकूण संख्या 400 झाली आहे. याआधी सोमवारी केवळ 29 अर्ज दाखल झाले होते, त्यामुळे शेवटच्या दिवसाची गर्दी अधिक लक्षवेधी ठरली.
 
2017 साली झालेल्या पनवेल महापालिका निवडणुकीत एकूण 418 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्या तुलनेत यंदाही उमेदवारांची संख्या जवळपास तितकीच राहण्याची शक्यता आहे. निवडणूक अधिकार्‍यांकडून अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम संख्या जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, अंतिम दिवशी 88 उमेदवारी अर्जांची खरेदी करण्यात आली. गेल्या आठवडाभरात इच्छुक उमेदवारांनी एकूण 1 हजार 133 अर्ज खरेदी केले होते.
 
Panvel
 
मात्र त्यापैकी केवळ 400 अर्जच दाखल झाल्याने उर्वरित 733 अर्जांचे काय झाले? याबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे. प्रभागनिहाय पाहता, प्रभाग समिती ‘अ’ (नावडे) अंतर्गत प्रभाग क्रमांक 1, 2 व 3 साठी सर्वाधिक 88 अर्ज दाखल झाले. कळंबोलीतील प्रभाग समिती ‘ब’ (प्रभाग 7 ते 10) येथे 81 अर्ज, प्रभाग समिती ‘क’ (प्रभाग 11 ते 13) येथे 64, पनवेल-1 (प्रभाग 14 ते 16) येथे 59, पनवेल-2 (प्रभाग 17 ते 20) येथे 55, तर खारघर (प्रभाग 4 ते 6) येथे 53 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
भाजपचे धक्कातंत्र! पंधराहून अधिक माजी नगरसेवक बाहेर!
पनवेल । पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने अनेक इच्छुकांना धक्का दिला आहे. यात पंधराहून अधिक माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली नाही. काहींच्या कुटुंबामध्ये संधी देण्यात आलेली आहे. नवीन चेहरेसुद्धा रिंगणात उतरविण्यात आले आहेत.
 
निष्ठावंत आणि अ‍ॅक्टीव्ह पदाधिकार्‍यांनाही उमेदवारीच्या रुपाने पोच पावती देण्यात आले आहे. एकूण 20 प्रभागांतील 71 जागांवर भाजप थेट निवडणूक लढवत असून उर्वरित जागा मित्र पक्षांना सोपवण्यात आल्या आहेत. संख्याबळाच्या दृष्टीने ही मोठी तयारी असली तरी उमेदवार निवडीसाठी तारेवरची कसरत करावी लागेल.
 
पंधराहून अधिक विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारणे. मागील टर्ममध्ये सक्रिय काम करणारे, निवडून येण्याची क्षमता असलेले काही चेहरे बाजूला सारण्यात आले. विशेष म्हणजे काही ठिकाणी त्या जागी थेट पत्नी, पती, मुलगा, मुलगी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Panvel
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची माघार!
प्रभाग क्रमांक 19 मधून माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यावेळी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पक्षाला पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे त्यांच्या जागी सुमित उल्हास झुंझारराव यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. खारघर हा भाजपसाठी कायमच सुरक्षित भाग समजला जातो.
 
यावेळी पक्षाने येथे सर्वाधिक धक्कादायक निर्णय घेतले. नेत्रा किरण पाटील, निलेश बाविस्कर आणि अभिमन्यू पाटील यांना थेट तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्या जागी परेशा ब्रिजेश पटेल, मधु पाटील, समीर कदम यांना उमेदवारी देण्यात आली.
 
भाजपचे धक्का तंत्र! पंधराहून अधिक माजी नगरसेवक बाहेर !
शेकापमधून प्रवेश केलेल्यांना संधी! प्रभाग ६ मधून शेतकरी कामगार पक्षातून भाजपमध्ये आलेल्या उषा अजित अडसुळे यांना संधी देण्यात आली. मागील निवडणुकीत एक अंकी मताने त्यांचा पराभव झाला होता.
 
'जिंकण्याची क्षमता' हा निकष पुढे ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी आरती नवघरे या भाजपच्या नगरसेविका होत्या. मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोनल अजिंक्य नवघरे यांना उमेदवारी देत त्यांच्या कुटुंबाच्या दीर्घकालीन पक्षनिष्ठेला महत्त्व दिले आहे
 
Powered By Sangraha 9.0