रखडलेल्या पाणी योजनांवरुन खा.तटकरे संतापले , काम सुरु करा, अन्यथा ठेकेदारी कायमची रद्द करु!

30 Dec 2025 20:54:49
mhasala
 
म्हसळा । म्हसळ्यातील रखडलेल्या पाणी योजनांवरुन खा.सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त करत, ‘काम सुरु करा अन्यथा ठेकेदारी कायमची रद्द करु’, असा इशारा ठेकेदाराला दिला आहे. खा.तटकरे सोमवारी (29 डिसेंबर) म्हसळ्याच्या दौर्‍यावर आले होते.
 
यावेळी म्हसळा पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील विविध विकासकामांबाबत महत्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खा.तटकरे यांनी रखडलेल्या पाणी योजनांवरून प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलेच धारेवर धरले. जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खेळण्यासारखा घेऊ नका, तातडीने काम सुरू न झाल्यास संबंधित ठेकेदाराची नोंदणी रद्द करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन, असा सज्जड दम तटकरे यांनी भर सभेतून फोनवरून ठेकेदाराला दिला.
 
तालुक्यातील तुरुंबाडी, काळसुरी आणि वारळ येथील पाणीपुरवठा योजना अपूर्ण असल्याबद्दल खासदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे होत असलेले हाल पाहून त्यांनी केवळ अधिकार्‍यांना झापले नाही, तर सभेच्या ठिकाणाहूनच संबंधित ठेकेदाराला फोन लावून विचारणा केली. यावेळी त्यांनी 2 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे निर्देश दिले असून, तात्पुरती पाणी टंचाई दूर करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
बौद्ध समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश
म्हसळा शहरातील बौद्ध समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. या गंभीर विषयाची दखल घेत, तहसीलदार आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी आणि त्याचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश तटकरे यांनी दिले.
 
या निर्णयामुळे समाजातील प्रलंबित प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. प्रशासनाने कामाचा वेग वाढवावा, जनतेच्या प्रश्नांवर टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा खा.सुनील तटकरे यांनी बैठकीमध्ये दिला.
प्रशासकीय यंत्रणेची उपस्थिती
या आढावा सभेत तालुक्यातील ग्रामीण रस्ते आणि मूलभूत सुविधांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी माधव जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, नगरपंचायत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांच्यासह राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष समीर बनकर, कृषी सभापती बबन मनवे, नाझीम हसवारे आणि विविध विभागांचे अधिकारी, सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0