अलिबाग । खोपोलीतील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येच्या घटनेचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटायला सुरूवात झाली आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारी (28 डिसेंबर) शिवसैनिकांनी अलिबाग तालुक्यातील पोयनाड नाका येथे निदर्शने केली.
शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हल्लेखोरांचा निषेध करण्यात आला. यावेळी मारेकर्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. नगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे कट रचून मंगेश काळोखे या शिवसैनिकाची हत्या करण्यात आली.
या कटाचे मुख्य सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे असून त्यांना अटक होईपर्यंत जिल्हाभरात शिवसैनिकांची आंदोलने सुरूच राहतील, असा इशारा जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी यावेळी दिला. शिवसेना युवासेना तालुका प्रमुख संदेश थळे, अलिबाग तालुका संघटक जीवन पाटील, कुर्डुस विभागप्रमुख स्वप्नील म्हात्रे, युवासेना उपप्रमुख संकेत पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख निखील तावडे, मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख रेश्मा जोशी, महिला आघाडी कुर्डुस विभाग प्रमुख सुकेशिनी पाटील, उपतालुकाप्रमुख विकास निळकर, प्रतिक पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. पोयनाड नाक्यावर झालेल्या आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती.