माणगाव एसटी स्थानकात प्रवाशांचे हाल , माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन बसफेर्‍यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

29 Dec 2025 18:09:56
 dighi
 
दिघी । माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन या महत्त्वाच्या मार्गावरील स्थानिक एसटी बस वेळेवर न लागल्याने शुक्रवारी माणगाव एसटी स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली. सकाळी 10.30 वाजल्यापासून तब्बल तीन तास एकही बस न सोडल्याने शेकडो प्रवासी स्थानकात अडकून पडले.
 
दुपारनंतर उशिरा एक बस सुरू झाल्यानंतर संतप्त प्रवाशांनी एसटी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवासी शासकीय कामकाज, शिक्षण, आरोग्य सेवा तसेच नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर माणगाववर अवलंबून आहेत. मात्र दर तासाला लोकल एसटी फेरी उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
 
याचा फटका कर्मचारी, विद्यार्थी व रुग्णांना बसत असून अनेकांना कामावर व शिक्षण संस्थांमध्ये उशिरा पोहोचावे लागले. मुंबईकडून येणार्‍या एसटी बसेस आधीच प्रवाशांनी भरलेल्या असल्याने स्थानिक प्रवाशांना बसमध्ये प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तसेच स्लीपर कोच बसेसमध्ये उभ्या प्रवाशांना परवानगी नसल्याने अनेक जण तासन्तास बसची वाट पाहत उभे राहिले.
 
यातच माणगाव एसटी स्थानकाचे बांधकाम सुरू असल्याने बसण्यासाठी पुरेशी सोय नाही. तीव्र उन्हात प्रवाशांना उभे राहावे लागत असून महिला, वृद्ध, लहान मुले व आजारी प्रवाशांचे विशेष हाल होत आहेत. पिण्याचे पाणी, सावली व स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव जाणवत आहे ही समस्या कायमस्वरूपी असूनही एसटी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
 
माणगाव-श्रीवर्धन-म्हसळा मार्गावर दर तासाला लोकल एसटी फेरी सुरू करावी, गर्दीच्या वेळेत अतिरिक्त बसेस लावाव्यात तसेच स्थानकातील सुविधा तातडीने सुधाराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा प्रवासी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0