नवीन पनवेल । पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी सतर्कता बाळगत धडाकेबाज कारवाई केली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून पोलिसांनी एकाकडून एक पिस्टल आणि सहा जीवंत काडतुसे जप्त केली आहेत.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत एका संशयित इसमाकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावला. तपासादरम्यान अनंथ अधिमुलाम पाडायची (रा. सानपाडा) या इसमास ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक पिस्टल व सहा जिवंत काडतुसे आढळून आली.
त्याच्याविरुद्ध रविवार, दि. 28 डिसेंबर रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे असलेले पिस्टल कशासाठी आणले होते तसेच ते कोणाला विक्री करण्याचा त्याचा उद्देश होता, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.