पर्यटकांच्या उत्साहावर वाहतूक कोंडीचे पाणी , रखडलेल्या महामार्ग, बायपास कामांचा पर्यटकांनाही फटका

27 Dec 2025 17:03:30
 MANGOV
 
माणगाव । माणगाव ख्रिसमस, शनिवार रविवारच्या सलग सुट्ट्या आणि थर्टी फर्स्टच्या पोर्शभूमीवर पुणे, मुंबई, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाकडे जाणार्‍या पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. मात्र या पर्यटकांचे स्वागत करण्यास माणगावची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
 
रखडलेल्या महामार्ग व बायपास कामांमुळे माणगाव शहर व परिसरात भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली असून नागरिकांसह पर्यटकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे बाजूकडून ताम्हिणी घाट मार्गे माणगावकडे येणार्‍या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर मुंबई बाजूकडून कोकण व तळ कोकणात जाणार्‍या वाहनांच्या रांगा सकाळपासून दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पोहोचल्या होत्या.
 
परिणामी माणगाव शहर अक्षरशः ठप्प झाले होते. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना माणगाव पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेच्या पोलिसांची मोठी दमछाक झाली. माणगाव बस स्थानक, निजामपूर रोड, कचेरी रोड, मोर्बा नाका आदी प्रमुख ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने सर्व यंत्रणा अपुर्‍या पडत असल्याचे दिसून आले.
 
ख्रिसमसपासून थर्टी फर्स्टपर्यंत हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून पुढील काही दिवस माणगावकरांसाठी मोठी परीक्षा ठरणार आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून आलेले हजारो पर्यटक दिवेआगार, श्रीवर्धन, बोर्ली, हरिहरेेशर, मुरुड-जंजिरा यांसह कोकणातील विविध पर्यटनस्थळी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. मात्र या पर्यटनाचा लाभ होण्याऐवजी माणगाव बाजारपेठ व अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा असह्य ताण पडत आहे.
 
त्यामुळे स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून पर्यटकांनाही तासन्तास कोंडीत अडकावे लागत आहे. या संपूर्ण गोंधळामागे महामार्गाचे अपूर्ण काम, ठिकठिकाणी अर्धवट खोदलेले रस्ते, निकृष्ट नियोजन आणि केवळ कागदावरच राहिलेला बायपास हीच खरी कारणे असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. इंदापूर व माणगाव बाजारपेठेतील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी बायपास मार्ग देण्यात आला असला तरी त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे.
 
परिणामी वाहने पुन्हा शहरातच शिरत असून कोंडी अधिकच वाढत आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात हीच परिस्थिती उद्भवते, तरीही शासन व महामार्गाचे ठेकेदार याबाबत अद्यापही ढिम्म का आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वेळेत काम पूर्ण न करणार्‍या ठेकेदारांवर ठोस कारवाई का होत नाही? उद्घाटनांचे श्रेय घेण्यात व्यस्त असलेली यंत्रणा प्रत्यक्षात नागरिकांच्या त्रासाकडे डोळेझाक करत आहे का, असा संतप्त सवाल माणगावकर विचारत आहेत.
 
पर्यटनाच्या नकाशावर कोकण झळकत असताना तेथे जाणारा प्रमुख प्रवेशद्वार असलेला माणगावच जर ठप्प झाला असेल, तर हे शासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. वेळेत महामार्ग व बायपासची कामे पूर्ण झाली असती, तर ना नागरिकांना असा त्रास झाला असता, ना पोलिसांवर अतिरिक्त ताण आला असता. आता तरी शासनाने व संबंधित ठेकेदारांनी केवळ ओशासनांवर न थांबता प्रत्यक्ष कामाला गती द्यावी, अन्यथा सणासुदीच्या प्रत्येक सुट्टीत माणगावची वाहतूक कोंडी ही कायमची डोकेदुखी ठरणार असल्याची तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0