माथेरान । माथेरानमधील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन कोतवाल रोड येथील हेल्थ केअर सेंटरमध्ये हार्मनी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी माफक दरात तपासणी व औषधोपचार सुविधा सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमाला विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी भेट देत हार्मनी फाऊंडेशनचे संचालक नितीन कांदळगावकर, संचालिका नम्रता कांदळगावकर व संचालक सुभाष भोसले यांचे विशेष कौतुक केले. यावेळी सहाय्यक प्राध्यापक व सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रोजीना काझी यांचा नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
माथेरानसारख्या दुर्गम भागात सुसज्ज वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांना उद्भवणार्या विविध आजारांवर उपचार मिळावेत, या उद्देशाने हार्मनी फाऊंडेशनने हा उपक्रम हाती घेतल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. नगरपरिषदेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे ओशासन नगराध्यक्षांनी दिले.
या आरोग्यसेवेमध्ये स्त्रीरोग व प्रसूती सेवा अंतर्गत गर्भधारणेपूर्व सल्ला, नियमित गर्भतपासणी, उच्च जोखीम गर्भधारणेचे व्यवस्थापन, नॉर्मल व सिझेरियन प्रसूती, वेदनारहित प्रसूती सुविधा, मासिक पाळीचे विकार, गर्भनिरोधक सल्ला व कुटुंबनियोजन, तसेच मेनोपॉजसंबंधी सल्ला व उपचार दिले जाणार आहेत. तसेच मातृत्व व महिला आरोग्य सेवांमध्ये स्तनपान सल्ला, प्रसूतीनंतरची काळजी, महिलांचे वार्षिक हेल्थ चेकअप, किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य सल्ला, वंध्यत्वविषयक सल्ला व उपचार यांचा समावेश आहे.