नवी मुंबई । नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून गुरुवारी, 25 डिसेंबर रोजी व्यावसायिक प्रवासी वाहतुकीला अधिकृत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी चार हजारांहून अधिक प्रवाशांनी या विमानतळातून प्रवास करत नवी मुंबईचा हवाई प्रवास अनुभवला. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी स्वतः पहिल्या उड्डाणातील प्रवाशांचे स्वागत केले.
उद्घाटन सोहळ्यात परमवीर चक्र विजेते कॅप्टन बाणा सिंग आणि सुभेदार मेजर संजय कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत सादर झाले. यावेळी क्रीडाक्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि विशेष गरजा असलेले नागरिकही उपस्थित होते. काही वंचित कुटुंबे आणि दिव्यांग नागरिकांनी पहिल्यांदाच विमानप्रवासाचा अनुभव घेतला.
बेंगळुरूहून आलेल्या इंडिगोच्या पहिल्या व्यावसायिक उड्डाणाला पारंपरिक वॉटर कॅनन (जलतोफांची) सलामी देण्यात आली, ज्यामुळे आनंदाचे वातावरणात निर्माण झाले होते. विमानतळातील कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा,फ्रंटलाईन वर्कर्स तसेच विमानप्रवास करणार्या प्रकल्पग्रस्त महिला व इतर प्रवाशांसोबत अदानी यांनी संवाद साधला. नवी मुंबई विमानतळावरुन पहिल्या दिवशी एनएमआयएवरून 48 उड्डाणांची ये जा झाली असून, नऊ देशांतर्गत शहरांशी हवाई संपर्क प्रस्थापित झाला.
सकाळी पाच ते सात या वेळेत सर्वाधिक प्रवासी वाहतूक नोंदवली गेल्याचे अदानी उद्योग समूहाने स्पष्ट केले.मुंबईची वाढती हवाई गरज लक्षात घेता, नवी मुंबई विमानतळ ‘ट्विन-एअरपोर्ट सिस्टीम’चा पाया घालत असल्याचे दिसून आले. दरम्यान, दुसरीकडे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरुन स्थानिक भूमिपुत्रांनी नाराजी व्यक्त केली आहे.