कर्जत । कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला असून,निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आणि इतर मित्र पक्षांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या ‘कर्जत परिवर्तन आघाडी’ ने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला आहे.
थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कर्जत परिवर्तन आघाडीच्या उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांनी महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ.स्वाती लाड यांचा पराभव करुन दणदणीत विजय मिळविला.पुष्पा दगडे यांनी एकूण 12 हजार 916 मते मिळवली असून, त्यांनी डॉ. स्वाती लाड यांचा 4 हजार 470 मतांनी पराभव केला आहे. डॉ. लाड यांना 8 हजार 446 मते मिळाली. ही निवडणूक नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला राखीव प्रवर्गातून पार पडली होती.
कर्जत नगरपरिषदेतील मतमोजणी कर्जत नगरपरिषद कार्यालयात पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. धनंजय जाधव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण व सचिन राऊत यांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सदस्य पदाच्या एकूण 21 जागांपैकी कर्जत परिवर्तन आघाडीने 13 जागांवर विजय मिळवला असून, महायुतीला 8 जागांवर समाधान मानावे लागले आहे. कर्जत परिवर्तन आघाडीतील विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्र ेसचे 8, शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 तर आघाडी पुरस्कृत 1 उमेदवाराचा समावेश आहे. तर महायुतीकडून शिवसेनेचे 7 व भाजपचा 1 उमेदवार विजयी झाला आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार खालीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक 1। अरुणा प्रदीप वायकर-शिवसेना शिंदे गट, किशोर पांडुरंग कदम शिवसेना शिंदे गट प्रभाग क्रमांक 2। कोयल चैतन्य कन्हेरीकर-शिवसेना शिंदे गट, संकेत जनार्दन भासे-शिवसेना शिंदे गट प्रभाग क्रमांक 3। अंजली अतुल कडू-राष्ट्रवादी गट, संतोष सुरेश पाटील-शिवसेना ठाकरे गट प्रभाग क्रमांक 4 सुनिता योगेश गायकवाड राष्ट्रवादी गट, महेंद्र बबन चंदन-राष्ट्रवादी गट प्रभाग क्रमांक 5। राधिका पिंट्या पवार-राष्ट्रवादी गट, विजय किसन हजारे-शिवसेना शिंदे गट प्रभाग क्रमांक 6। सुवर्ण केतन जोशी-शिवसेना ठाकरे गट, प्रशांत वसंत पाटील अपक्ष (परिवर्तन आघाडी पुरस्कृत) प्रभाग क्रमांक 7। वैभव हेमंत सुरावकर-शिवसेना शिंदे गट, नेहा निलेश शिंदे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक 8। रामदास आत्माराम गायकवाड-भाजपा गट, सुचिता देवेंद्र खोत शिवसेना ठाकरे गट प्रभाग क्रमांक 9। कुमेश पांडुरंग मोरे-राष्ट्रवादी, जान्हवी सुदेश देवघरे-शिवसेना शिंदे गट प्रभाग क्रमांक 10। हर्षाली उमेश गायकवाड राष्ट्रवादी, अशोक बबन राऊत-राष्ट्रवादी, मानसी महेंद्र कानिटकर-शिवसेना ठाकरे गट.
पक्षांतर केलेल्या उमेदवारांना दणका...सुवर्णा जोशी यांनी खोडला इतिहास...
निवडणुकीच्या तोंडावर गौरी जोशी, बिनिता घुमरे, रॉली पाल आणि प्रसाद डेरवणकर या उमेदवारांनी पक्ष बदलले. ते सर्व या निवडणुकीत पराभूत झाले. एकदा नगराध्यक्ष झाल्यावर पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून येत नाही, असा कर्जतचा इतिहास आहे. मात्र माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी तो इतिहास खोडून टाकला व त्या 1 हजार 397 मताधिक्य घेऊन विजयी झाल्या.
या निवडणुकीत महेंद्र चंदन हे सर्वांत जास्त म्हणजे 1 हजार 67 मताधिक्य घेऊन विजयी झाले. तसेच कर्जत नगरपरिषद स्थापन झाल्यापासून प्रत्येक वेळी लाड आणि ओसवाल नावाचे नगरसेवक होते. या निवडणुकीत त्या नावाचे नगरसेवक निवडून आले नाहीत.
असे आहे पक्षीय संख्याबळ
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - 8
शिवसेना शिंदे गट। 7
शिवसेना ठाकरे गट। 4
भाजप। 1
अपक्ष (परिवर्तन आघाडी पुरस्कृत)। 1