पेण। पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रितम पाटील या निवडून आल्या आहे. या विजयाबरोबरच प्रितम पाटील यांनी नगराध्यक्षपदाची हॅट्रीक मारली आहे.
पेण शहरात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीसमोर आम्ही पेणकर, पेण नगरविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गटाने यांनी आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला; परंतु पेणच्या जनतेने भाजप महायुतीवर आणि खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविंद्र पाटील व प्रितम पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवल्याचे या निकालावरुन दिसून येते.
तिरंगी लढतीत भाजपच्या प्रितम पाटील यांची बाजी
नगराध्यक्षपदासाठी भाजप महायुतीकडून प्रितम पाटील, आम्ही पेणकर विकास आघाडीतर्फे रिया धारकर, काँग्रेसकडून नंदा म्हात्रे हे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभे होते. या तिरंगी लढतीत भाजपच्या प्रितम पाटील 14 हजार 273 मते मिळवून विजयी झाल्या. तर पेणकर विकास आघाडीच्या रिया धारकर यांना 8 हजार 412 मते तर काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांना 687 मते मिळाली.
नगरसेवकपदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपच्या कलावती पाटील, पेण नगरविकास आघाडीचे संतोष श्रुंगारपुरे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या पल्लवी कालेकर, आम्ही पेणकर विकास आघाडीचे प्रविण पाटील विजयी झाले. प्रभाग क्रमांक 3 मधून पेण नगरविकास आघाडीच्या सुजाता डाकी, पेण नगर विकास आघाडीचे संजय म्हात्रे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 4 मधुन शिवसेना ठाकरे गटाच्या अरुणा पाटील, शिवसेना शिंदे गटाचे भुषण कडू विजयी झाले.प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या अंजली जोगळेकर विजयी झाले.
प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपच्या संगीता लाड, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आनंद जाधव, प्रभाग क्रमांक 7 मधुन भाजपच्या आफ्रिन आखवारे, आम्ही पेणकर विकास आघाडीचे कृष्णा भोईर विजयी झाले. प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपच्या जास्वीन पाटील, भाजपचे अनिरुध्द पाटील विजयी झाले. प्रभाग क्रमांक 9 मधुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे निवृत्ती पाटील विजयी झाले. प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपच्या सुनिता जोशी, भाजपचे निळकंठ पाटील विजयी झाले.
सहा उमेदवारांची बिनविरोध निवड निवडणुकीआधीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे दिपक जयवंत गुरव, वसुधा तुकाराम पाटील, सुशिला हरिश्चंद्र ठाकूर आणि भाजपच्या स्मिता माळी, अभिराज कडू, मालती म्हात्रे हे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. या निवडणूक निकालानंतर भाजप महायुतीच्या विजयी उमेदवारांची गुलाल, भंडारा उधळत पेण शहरातून विजयी मिरवणूक काढली. या विजयी मिरवणुकीत आमदार रविंद्र पाटील यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पेण नगरपरिषदेतील संख्याबळ
भाजप। 9 + 3 बिनविरोध - एकूण 12
राष्ट्रवादी (अजित पवार) गट। 2 + 3 बिनविरोध - एकूण 5
पेण नगरविकास आघाडी। 3
आम्ही पेणकर विकास आघाडी। 2
शिवसेना ठाकरे गट। 1
शिवसेना शिंदे गट। 1