अलिबाग । रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल रविवारी (21 डिसेंबर) जाहीर झाले. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली होती. दोन पक्षांमधील हा राजकीय सामना ‘टाय’ झाल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात शिवसेनेने तीन, राष्ट्रवादीनेही तीन नगरपालिकांवर झेंडा फडकला आहे. भाजप, शेकाप, महाआघाडी आणि ठाकरे गटाने प्रत्येकी एका नगरपालिकेत आपला झेंडा फडकवला आहे. ठाकरे गटाने श्रीवर्धनमध्ये कमाल केली आहे. तर उरणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने धमाल केली आहे.
श्रीवर्धनमध्ये ‘वन मॅन आर्मी’ ठरलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. तर उरणमध्ये आ.महेश बालदी यांच्या वर्चस्वाला महाआघाडीने सुरुंग लावला आहे. भाजपच्या हातून कर्जत आणि उरण नगरपालिका गेली. राष्ट्रवादीच्या हातातून श्रीवर्धन आणि शिवसेना शिंदे गटाच्या हातातून मुरुड नगरपालिका गेली आहे.