महाड । रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित, शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महाड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिंदे शिवसेनेचे सुनील कविस्कर हे विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपद जरी शिवसेनेकडे गेले असले तरी राष्ट्रवादी-भाजप युतीने नगरसेवकपदाच्या 12 जागा जिंकून आणल्या आहेत.
यामध्ये राष्ट्रवादीच्या 10 तर भाजपच्या 2 जागांचा समावेश आहे. भाजपने प्रथमच महाड नगरपालिकेत 2 जागा जिंकून आपले खाते खोलले आहे. तर शिवसेनेने 8 जागा जिंकून आणल्या आहेत. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले महाविकास आघाडीचे चेतन पोटफोडे हे तिसर्या क्रमांकावर राहिले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अनेक ठिकाणी क्रॉस वोटींग झाल्याने पॅनल टू पॅनल उमेदवार निवडून आले नाहीत.
महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत गेल्या 30 ते 35 वर्षांच्या इतिहासात सुनिल कविस्कर यांच्या रुपाने शिवसेनेचा नगराध्यक्ष विजयी झाला आहे. शिवसेनेचे सुनील कविस्कर (8 हजार 91 मते) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युतीचे उमेदवार सुदेश कळमकर (7 हजार 399 मते) यांचा 692 मतांनी पराभव केला आहे. नगराध्यक्ष पदाच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे चेतन पोटफोडे यांना 504 मते तर अपक्ष उमेदवार गणेश कारंजकर यांना 301 मते मिळाली.
प्रभाग क्र. 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित साळी व वैशाली रक्ते, प्रभाग 2 मधून राष्ट्रवादीचे महेश शेडगे व शिवसेनेच्या पालवी गोळे, प्रभाग 3 मधून शिवसेनेचे प्रमोद महाडीक व राष्ट्रवादीच्या गितांजली महाडीक, प्रभाग 4 मधून राष्ट्रवादीचे हेमंत चांदलेकर व शिवसेनेच्या गायत्री कविस्कर, प्रभाग 5 मधून राष्ट्रवादीचे वजीर कोंडीवकर व हवा पानसरी, प्रभाग क्र. 6 मधून भाजपचे सुरज बामणे व शिवसेनेच्या विद्या देसाई, प्रभाग 7 मधून राष्ट्रवादीचे संदीप जाधव व शिवसेनेच्या पुजा गोविलकर, प्रभाग 8 मधून राष्ट्रवादीच्या अक्षया हेलेकर व भाजपचे सुमित पवार, प्रभाग 9 मधून शिवसेनेचे निखिल शिंदे व राष्ट्रवादीच्या दिक्षा शिंदे, प्रभाग 10 मधून शिवसेनेचे दिपक चव्हाण व मिनल जाधव हे विजयी झाले आहेत.
महाड नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेवर विश्वास दाखविणार्या मतदार व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. येणार्या काळात महाडमध्ये विकासाची गंगा आणू, असे सांगितले.
तटकरेंना टोला लगावताना महाडमध्ये विरोधकांनी डोकावून बघू नये इथे शिवसेनेशिवाय पर्याय नाही, असे सांगितले. घरपट्टीमध्ये 50 टक्के सूट देण्याच्या प्रश्नावर नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे गोगावले यांनी स्पष्ट केले. महाडमधील राष्ट्रवादीच्या नेत्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी भाजप युतीच्या 12 नगरसेवकांना विजयी सुरुवात झाली. या जिल्हा पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलहस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मतमोजणी पार पडल्यानंतर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतीषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा केला. दरम्यान, महाडचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांनी निवडून आलेल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले. त्याआधी ना.गोगावले यांनी महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.