पनवेल । पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पोर्शभूमीवर संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असली, तरी प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर होण्याआधीच अंतर्गत राजकारण, नाराजी, दबाव तंत्र आणि समीकरणे अधिक तीव्र होत चालली आहेत.
केवळ विरोधकांशी लढा न राहता, ही निवडणूक अनेक ठिकाणी पक्षांतर्गत शक्तिपरीक्षा ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारीच्या स्पर्धेत निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्ते मात्र बाजूला राहण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये इन्कमिंग तर महाविकास आघाडी मधील अनेक घटक पक्ष यामुळे हा पेच निर्माण झालेला आहे.
भाजपमध्ये इनकमिंगमुळे समीकरणे बदलली!
पनवेलमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये शेतकरी कामगार पक्षातून आलेल्या स्टँडिंग नगरसेवकांच्या प्रवेशामुळे राजकीय गणिते पूर्णतः बदलली आहेत. या इनकमिंगमुळे पक्षाच्या परंपरागत कार्यकर्त्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या पाच वर्षांत महापालिकेत विरोधी बाकावर असताना किंवा सत्तेत सहभागी असतानाही, जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणार्या अनेक कार्यकर्त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली होती.
पक्ष विस्ताराच्या नावाखाली बाहेरून आलेल्या नेतृत्वाला थेट तिकीट दिल्यास, दीर्घकाळ पक्षासाठी झटलेल्या निष्ठावंतांवर अन्याय होईल, अशी भावना पक्षाच्या खालच्या फळीपर्यंत पोहोचली आहे. परिणामी, काही प्रभागांमध्ये बंडखोरीची कुजबुज सुरू झाली असून, अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतर ती उघडपणे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निष्ठा, काम आणि संधी यातील विसंगती!
गेल्या काही वर्षांत नागरिकांचे प्रश्न, पाणी, रस्ते, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, सिडकोसंबंधी समस्या, पुनर्वसन, झोपडपट्टी प्रश्न अशा अनेक विषयांवर झोकून देऊन काम करणार्या कार्यकर्त्यांना उमेदवारीपासून दूर ठेवले जाणार असल्याची शक्यता निर्माण झाल्याने असंतोष वाढतो आहे.
अनेकांनी पक्षाच्या सांगण्यावरून स्वतःचे सामाजिक, व्यावसायिक हितसंबंध बाजूला ठेवून पूर्ण वेळ राजकारण केले; मात्र आज निर्णायक क्षणी संधी हुकण्याची भीती त्यांच्या मनात घर करून बसली आहे.
महाविकास आघाडीत जागावाटपाचा गुंता!
दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्येही जागावाटप हा सर्वात मोठा कळीचा मुद्दा ठरला आहे. शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार), काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि खारघर-कामोठे कॉलनी फोरम यांसारख्या घटक पक्षांची संख्या अधिक असल्याने प्रत्येक प्रभागावर दावे प्रचंड वाढले आहेत.
काही प्रभागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून तयारी करणारे इच्छुक आहेत. मात्र, आघाडीधर्म पाळताना त्याग करावा लागेल, ही वस्तुस्थिती अनेकांना मान्य नसल्याने अंतर्गत तणाव वाढला आहे. वरिष्ठ पातळीवर समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी स्थानिक पातळीवर असंतोषाचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
कार्यकर्त्यांची मानसिकता आणि नेतृत्वाची कसोटी!
आघाडीतील नेते कार्यकर्त्यांना एकसंधपणे निवडणूक लढवण्याचे आवाहन करत असले, तरी काम केले तरी संधी नाही ही भावना बळावत चालली आहे.
अनेक ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात संवादाची दरी वाढत असून, निर्णय लादले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. हीच भावना पुढे जाऊन प्रचारातील उदासीनता किंवा अंतर्गत विरोधात रूपांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मैत्रीपूर्ण लढती की थेट संघर्ष?
काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचे प्रस्ताव पुढे येत आहेत. मात्र, यामुळे अधिकृत उमेदवारांचे नुकसान होईल आणि मतविभाजन होण्याची शक्यता असल्याने, पक्षश्रेष्ठी या पर्यायाकडे साशंक नजरेने पाहत आहेत. विशेषतः अटीतटीच्या लढती असलेल्या प्रभागांमध्ये याचा थेट फटका निकालावर पडू शकतो.
अंतिम यादीनंतर खरा राजकीय ताप!
खरा राजकीय ताप अंतिम उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतरच वाढणार आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये नाराजी, बंडखोरी, प्रचारापासून अलिप्तता किंवा अपक्ष उमेदवारी यासारख्या शक्यता निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वरिष्ठ नेतृत्वासाठी ही निवडणूक केवळ जागा जिंकण्यापुरती न राहता, संघटन टिकवण्याचीही मोठी परीक्षा ठरणार आहे.
नेतृत्व आणि संघटनशक्तीची कसोटी!
पनवेल महानगरपालिका निवडणूक ही विकास, सत्ता आणि आकडेवारी यापुरती मर्यादित न राहता, निष्ठा, संधी, नेतृत्व आणि संघटनशक्ती यांची कसोटी ठरणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अंतर्गत नाराजी कशी हाताळतात, कोणाला संधी देतात आणि कुणाला थांबवतात यानंतर बर्याचशा गोष्टी आणि घडामोडी घडतील असा अंदाज वर्तवला जात आहे.