बापाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न लेकीने केले पूर्ण... रोहा नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या वनश्री शेडगे विजयी

22 Dec 2025 21:17:04
roha
 
रोहा । रोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्षपदी वनश्री समीर शेडगे यांनी 4 हजार 695 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांचे नऊ वर्षांपूर्वी अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केले.
 
2016 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले समीर शेडगे यांना केवळ 6 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. रविवारी (21 डिसेंबर) झालेल्या मतमोजणीत वनश्री समीर शेडगे यांना 8 हजार 586 मते तर विरोधी शिवसेना शिंदे गटाच्या उमदेवार शिल्पा अशोक धोत्रे यांना 3 हजार 891 मते मिळाली. तर 231 मतदारांनी नोटाला मतदान केले. रोहा नगरपालिकेत भाजपने 24 वर्षांनी पुन्हा खाते उघडले असून प्रभाग क्रमांक 9 मधून तरुण सामाजिक कार्यकर्ते रोशन विष्णू चाफेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे.
 
roha
 
तर ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेल्या शिवसेना शिंदे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यांच्या याच प्रभागातील उमेदवार सुप्रिया जाधव या विजयी झाल्या आहेत. त्यांच्या या विजयात पक्षापेक्षाही शिल्पा धोत्रे व अशोक धोत्रे यांनी या प्रभागात केलेल्या कामाचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीतील बहुतांश प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून, एका प्रभागात बिनविरोध विजयही मिळाला आहे.
 
एका प्रभागामध्ये उमेदवार पराभूत झाले असले, तरी एकूण निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने झुकलेला दिसून येतो. विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीच्या नीता महेश हजारे, प्रशांत कडू, फराह पानसरे, अफ्रिन रोगे, अरबाज मणेर, स्नेहा अंबरे, अहमद दर्जी, आलमास मुमेर, महेंद्र गुजर, गौरी बारटक्के, महेंद्र दिवेकर, प्रियांका धनावडे, रवींद्र चाळके, संजना शिंदे, महेश कोलटकर, पूर्वा मोहिते, अजित मोरे तर बिनविरोध निवडून आलेले राजेंद्र जैन यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेना शिंदे गटाच्या सुप्रिया जाधव आणि भाजपचे रोशन चाफेकर हे विजयी झाले आहेत.
 
roha
 
दरम्यान, नऊ वर्षांपूर्वी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी 6 मतांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक गमावली होती, तेव्हापासूनच त्यांच्या मनाची घालमेल त्यांची लेक वनश्री व कुटुंबियांनी पाहिली होती, किंबहुना ती रोहेकरांनीसुद्धा अनुभवली होती. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर बापलेक दोघांनाही अश्रू अनावर झाले..एकमेकाला मिठी मारत दोघांनी अश्रूंना वाट मोकळी केली. या निकालामुळे रोहा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत सिद्ध झाले आहे. नगराध्यक्ष वनश्री समीर शेडगे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. विजयानंतर राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष साजरा केला.
 
roha
 
Powered By Sangraha 9.0