उरण | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी, भूमिपुत्रांनी २२ डिसेंबर रोजी नवी मुंबई विमानतळावर जनआक्रोश मोर्चाचे केले आहे. हा मोर्चा सर्वपक्षीय नामकरण समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली.
भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व सर्वपक्षीय समितीने करावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार समितीने जबाबदारी स्वीकारून जनाक्रोश दिंडी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. २५ डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होत असल्याने नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विमानतळाचे उद्घाटन होऊनही नामकरणाबाबत सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे भूमिपुत्रांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
नावासाठी २०२१ पासून स्थानिक भूमिपुत्रांनी सातत्याने संघर्ष केला आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सहमती दर्शविली असून विविध बैठकींत आश्वासनेही देण्यात आली आहेत. मात्र उद्घाटनानंतरही नामकरणाबाबत ठोस निर्णय न झाल्याने शंका निर्माण झाली आहे.