राज्यातील दहा जिल्ह्यात‘उमेद मॉल’ उभारणार , २०० कोटीचा निधीची तरतुद; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

13 Dec 2025 13:23:15
 nagpur
 
नागपूर | राज्यातील महिला स्वयंसाहाय्यता गटांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘उमेद मॉल’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याचे लक्ष्य असून, त्यासाठी सरकारने २०० कोटींची तरतूद केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
 
विधानसभा सदस्य राणा जगजितसिंह पाटील, सुनील प्रभू, योगेश सागर, संजय कुटे, नारायण कुचे, सुधीर मुनगंटीवार, सत्यजित देशमुख, मुरजी पटेल, समीर मेघे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उमेद मॉल संदर्भात प्रश्न विचारला होता. यावर मंत्री श्री.गोरे यांनी माहिती दिली.
 
राज्यात ६ लाख ५३ हजार १९२ बचत गट कार्यरत असून, त्यांना आतापर्यंत ८७२ कोटींचा फिरता निधी वितरित केला आहे. तर ३ लाख ७० हजार ३५० गटांना २२२ कोटींचा समुदाय निधी देण्यात आला आहे. बँकांकडूनही मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळत आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून ‘महालक्ष्मी सरस’, जिल्हा आणि मिनी सरस अशा प्रदर्शनांचे आयोजन राज्यभर करण्यात येते.
 
मात्र ही केंद्रे तात्पुरती असल्याने महिलांसाठी १२ महिने उपलब्ध असलेली कायमची बाजारपेठ तयार करण्याचा निर्णय म्हणजे ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात किमान २० हजार चौ.फुटाचे मॉल उभारण्याचा विचार असून जिल्हा परिषदांकडून योग्य जागांची निवड सुरू असल्याचे मंत्री गोरे यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0