अलिबाग | अलिबागच्या नागावमध्ये बिबट्या येऊन २४ तास उलटून गेले तरी त्याला जेरबंद करण्यात अद्याप वन विभागाला यश आलेले नाही. त्यामुळे नागावमध्ये भितीचे सावट कायम आहे. वन विभागाचे ८० कर्मचारी, अधिकारी मंगळवारपासून शोध मोहीम राबवत आहेत.
संध्याकाळनंतर बिबट्या कुणाच्या नजरेस पडला नाही; त्यामुळे तो कदाचित त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत गेला असण्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. मात्र याबाबत खात्री होत नाही तोवर शोध मोहीम सुरूच राहणार असल्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले. बिबट्या मोकाटच असल्याने नागावमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे.
त्यामुळे नागावमधील सर्व शाळा बुधवारीही बंद ठेवण्यात आल्या होत्या. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नका, एकटे फिरू नका, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. मंगळवारी (९ डिसेंबर) सकाळपासून नागावमध्ये भर वस्तीत बिबट्या शिरला. त्याने जवळपास पाच जणांवर हल्ला केला. वनविभाग, बचाव पथके आणि पोलिसांनी दिवसभर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला अद्याप यश आलेले नाही.