माथेरानची मिनीट्रेन पुन्हा पर्यटकांच्या सेवेत दाखल ; पहिलाच प्रवास हाऊसफुल, वातानुकूलित प्रवासाला थंडा प्रतिसाद

07 Nov 2025 21:09:07
 karjat
 
कर्जत | पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन गुरुवारी, ६ नोव्हेंबरपासून पर्यटक प्रवासी यांच्या दिमतीस आली. नेरळ-माथेरान-नेरळ या पहिल्या गाडीला पर्यटकांनी हाऊसफुल प्रतिसाद दिला; मात्र वातानुकूलित गारेगार प्रवास करण्यासाठी जोडण्यात आलेला विस्टाडोम डब्बा मात्र पूर्णपणे रिकामा राहिला.
 
या पहिल्या प्रवासी गाडीला स्थानक प्रबंधक यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि प्रवासी वाहतूक सुरू झाली, त्याआधी रेल्वे अधिकारी कर्मचारी यांनी गाडीची भंडारा उधळून पूजाअर्चा केली. यावर्षी मे महिन्यात पाऊस आला आणि मिनीट्रेन २६ मे पासून बंद करण्यात आली. नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर मालवाहू गाड्यांची चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीमध्ये २८ ऑक्टोबर रोजी नेरळ येथून निघालेली मालवाहू गाडी कोणत्याही अडथळा विना पोहचली होती.
 
त्यानंतर पुन्हा मालवाहू गाडी दोन नोव्हेंबर साठी पाठवण्यात आली आणि या मालवाहू गाडीचा प्रवास सुखरूप झाल्यानंतर नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारी, ६ नोव्हेंबर रोजी प्रवासी गाडी सुरू केली. नेरळ येथून सहा प्रवासी डब्बे लावलेली पावसाळा नंतरचे हंगामातील पहिली मिनीट्रेन माथेरान साठी रवाना झाली. त्याआधी नेरळ स्थानकात या गाडीच्या इंजिनाची पूजा करण्यात आली.
 
या पहिल्या गाडीचे सारथ्य अनुभवी चालक हरीश चिंचोळे यांनी केळे तर त्यांना सहाय्यक म्हणून मुकेश योगी यांनी साथ दिली. या गाडीचे गार्ड म्हणून हरदेव मीना तर तिकीट तपासनीस भगत हे होते. पहिल्या गाडीमधील द्वितीय श्रेणीची सर्व ९० तिकिटे संपली तसेच प्रथम श्रेणीची २२ तिकिटे तिकीट खिडकी उघडल्यावर काही मिनिटात संपली. पहिली तिकीट दहा जणांच्या ग्रुपने मिळविली असून या गाडी साठी लावण्यात आलेला वातानुकूलित डब्बा मात्र रिकामा राहिला.
 
या पहिल्या गाडीला प्रभारी स्थानक प्रबंधक धीरेंद्र सिंह यांनी हिरवी झेंडे दाखवली. त्यावेळी स्थानक प्रबंधक पाटील, वाहतूक निरीक्षक अनुप कुमार सिंह, मुख्य तिकीट निरीक्षक जे जी विनोद, बिर्जन कुमार तर बुकिंग क्लार्क योगेंद्र राजावत, प्रेमचंद ऑड यांनी काम पाहिले. श्रीफळ वाढवण्याचे काम या रेल्वे मार्गाची देखभाल ठेवणारे कनिष्ठ अभियंता सानप यांनी वाहिला.
नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर चालवल्या जाणार्‍या गाड्यांचे वेळापत्रक
नेरळ येथून माथेरानसाठी ः सकाळी ०८.५०, सकाळी १०.२५
माथेरान येथे पोहचणार ः सकाळी ११.३०, दुपारी ०१.०५
माथेरान येथून नेरळसाठी ः दुपारी ०२.४५, दुपारी ०४.००
नेरळ येथे पोहचणार ः सायंकाळी.०५.३०, सायंकाळी ०६.४०
Powered By Sangraha 9.0