अलिबाग । पुण्यातून रायगड जिल्ह्यातील दिवेआगरला फिरायला आलेल्या तरुणांच्या महिंद्रा थार कारला ताम्हाणी घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही थार कार 500 फूट खोल दरीत कोसळली होती. विशेष म्हणजे तीन दिवसांनंतर या अपघाताची घटना समोर आली.
दुसरी घटना पेण तालुक्यात घडली. एका दुचाकीला झालेल्या अपघातात दोन जीवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघातानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
माणगाव । ताम्हिणी घाटात महिंद्रा थार वाहन 500 फूट खोल दरीत कोसळून पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. तीन दिवस बेपत्ता असलेल्या या तरुणांचा शोध गुरुवारी (20 नोव्हेंबर) सकाळी ड्रोनच्या सहाय्याने लावण्यात आला.
या घटनेनंतर मृत तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुणे कोपरेगाव, उत्तमनगर येथे राहणारे साहील सादु गोठे (वय 24) पुनित सुधाकर शेट्टी (20), ओमकार सुनिल कोळी (18), शिवा अरुण माने (19), महादेव कोळी (18) हे सहा मित्र 17 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास महिंद्रा थार घेवून रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे पर्यटनासाठी निघाले होते. 18 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सर्वांच्या मोबाईलवर कॉल लागत होते.
मात्र त्यानंतर सर्वांचे फोन बंद लागल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. 19 नोव्हेंबर रोजी पहाटे 1 वाजता फिर्यादी सादु गोठे व इतर नातेवाईक आणि मित्रांनी स्वतः शोधमोहीम सुरू केली. ताम्हिणी घाट, विळे-भालगाव परिसर, दिवेआगर रस्ते, हॉटेल, लॉज, फार्महाऊस सर्वत्र शोध घेण्यात आला, परंतु थार गाडी किंवा तरुणांचा शोध लागला नाही. शेवटी त्यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार केली.
20 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता शोध सुरु झाला. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे, शेलार मामा रेस्क्यू टीम, माणगाव, रेस्क्यू टीम, कोलाड, साळुंखे रेस्क्यू टीम, माणगाव, माणगाव पोलीस या सर्वांनी मिळून मोठी शोधमोहीम सुरू केली. सकाळी 9 वाजता ड्रोनकॅमेराद्वारे मौजे सणसवाडी गाव हद्दीत खोल दरीमध्ये झाडीमध्ये अडकलेली थार गाडी आणि सहा मृतदेह दिसून आले. नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून मृतदेहांची ओळख पटवण्यात आली.
मृतदेह पाहून या तरुणाच्या कुटुंबाचा अश्रूंचा अक्षरशः बांध फुटला. एकाच गावातील सहा तरुणांचा मृत्यू झाल्याने कोपरेगाव तसेच ताम्हिणी परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईकांच्या डोळ्यातून अश्रू थांबेनासे झाले असून, सोशल मीडियावरही दुःखाची लाट उसळली आहे. दरम्यान, ताम्हिणी घाट हा निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखला जातो, मात्र येथील अरुंद आणि वळणावळणाचे रस्ते अपघातांना आमंत्रण देतात. या भीषण अपघातामुळे या तरुणांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या अपघाताचा सखोल तपास केला जात आहे.