खोपोली । खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांच्या छाननी प्रक्रिया चांगलीच रखडल्याचे पहायला मिळाले. या नगरपालिकेत प्रमुख राजकीय पक्षांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आला.
खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. सुनिल पाटील तसेच कुलदिपक शेंडे यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. या अर्जांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले पत्रकार अनिल वाघमारे यांनी आक्षेप घेतला.
राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.सुनिल पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे कुलदिपक शेंडे यांच्यावर सन- 2007 साली सिटी बस ठेक्यावरील थकबाकीबाबतचा आक्षेप घेतला आहे. यावर दोन्हीही उमेदवारांच्या वकीलांनी युक्तिवाद करुन 2007 नंतर दोन वेळा नगरसेवकपदाची निवडणूक लढविली असताना कोणतीही थकबाकी नसल्याचे दाखले दिलेत तर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी लढवित असताना थकबाकी दाखले दिले.
तरीही वाघमारे यांनी डॉ.सुनिल पाटील तसेच कुलदिपक शेंडे यांच्यावर आक्षेप घेतला आहे. प्रभाग 4 मध्ये माधवी रिठे, प्रभाग 11 मध्ये संतोष मालकर, शिल्पा मालकर, प्रभाग क्र 2 मानसी काळोखे, प्रभाग क्र.10 मधील हरिश काळे, प्रभाग 3 रेखा जाधव यांच्यावर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती.