पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही , नगरपालिका निवडणूक । राजकीय पक्षांमध्ये सन्नाटा कायम!

By Raigad Times    11-Nov-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग । जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका सुरु झाल्या आहेत. अर्ज भरण्याचा सोमवारी (10 नोव्हेंबर) पहिला दिवस होता. मात्र पहिल्याच दिवशी जिल्ह्यात एकाही नगरपालिकेमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. नगरपालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या आघाडीवर अजूनही म्हणावी तशी गडबड दिसत नाही.
 
‘कामाला लागा’ असे संकेत मिळाले असले तरी अधिकृत घोषणा होत नसल्याने इच्छुकांची घालमेल सुरू आहे. प्रचाराला कमी वेळ मिळणार असल्याने ही चिंता इच्छुकांना सतावते आहे. जिल्ह्यातील 10 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरूवात झाली. मात्र राजकीय पक्षांमध्ये अर्ज भरण्यासाठी अजून कुठेही लगबग पहायला मिळत नाही. उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सर्वजण एकत्र जाऊन अर्ज सादर केले जाणार आहेत.
 
उमेदवारांना 17 नोव्हेंबरपर्यंत आपले अर्ज भरता येणार आहेत. परंतु प्रमुख राजकीय पक्ष अजूनही युती आघाडीच्या जंजाळात अडकून पडले आहेत. एखाद्या नगरपालिकेतील प्रबळ पक्ष दुसर्‍या सहयोगी पक्षाला जागा सोडायला तयार नाही. ही स्थिती बहुतांश नगरपालिकांमध्ये पहायला मिळते आहे. या पक्षांमध्ये गुप्त बैठका सुरू आहेत. त्यातून एकमेकांची मनधरणी केली जात आहे. तर काही ठिकाणी.उमेदवारांची यादी तयार असूनही जाहीर केली जात नाही.
 
विरोधक कधी आपले उमेदवार जाहीर करतात, याची वाट पाहिली जात आहे.या सर्व घडामोडीत इच्छुक उमेदवारांची घालमेल मात्र वाढते आहे. आधीच नगरपालिका निवडणूका कमी कालावधीत आटोपल्या जात आहेत. त्यामुळे तयारीला आणि प्रचाराला खूपच कमी वेळ मिळणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर अशी आहे. तर चिन्ह वाटप 26 नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे.
 
मतदान 2 डिसेंबर रोजी होईल. चिन्ह वाटपानंतर प्रचाराला जेमतेम पाच दिवसच शिल्लक राहणार आहेत. या कालावधीत प्रचाराची एक फेरीदेखील पूर्ण होणार नाही असे इच्छुकांचे म्हणणे आहे. किमान एकदा तरी मतदारांच्या घरापर्यंत पोहोचायला हवे असेल तर उमेदवारी लवकर घोषित व्हायला हवी, यासाठी इच्छुकांची लगबग सुरू आहे. राजकीय पक्ष मात्र कुठेही बंडखोरी होऊ नये, याची काळजी घेत आहेत. जेथे बंड होण्याची शक्यता आहे तेथे समजूत काढली जात आहे.
 
जर उमेदवारी लवकर जाहीर झाली तर तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले इच्छुक बंडाचा झेंडा उभारू शकतात. त्यांना यासाठी पुरेसा वेळ मिळू नये, यासाठी राजकीय पक्षांकडून दक्षता बाळगली जात आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी सोमवारी एकही उमेदवारी अर्ज आला नसला तरी पुढच्या काही दिवसांत उमेदवारी अर्जांचा ढिग लागण्याची शक्यता आहे.