मुरुड । जिल्ह्यातील मुरूड काशीद समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या शिक्षक व विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (8 नोव्हेंबर) सायंकाळी घडली. अकोल्यातील शुअरवीन क्लासेसमधील 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक शैक्षणिक सहलीसाठी काशीद बीचवर आले होते.
मात्र, समुद्रात पोहताना अचानक आलेल्या लाटेमुळे दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक पाण्यात बुडाले. यामध्ये 60 वर्षीय शिक्षक राम कुटे आणि 19 वर्षीय विद्यार्थी आयुष रामटेके यांचा मृत्यू झाला आहे. तर आयुष बोबडे या 17 वर्षीय विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आले असून तो सुखरूप आहे.
आयुष रामटेके हा शिकवणी क्लासेसचा विद्यार्थी नसून शिक्षकांच्या घराशेजारील राहणारा तरुण होता, असे काही शिक्षकाचे म्हणणे आहे. दरम्यान, फिरण्यासाठी सोबत आलेले शिकवणी क्लासमधील तिन्ही विद्यार्थी सुखरूप असल्याचे शिकवणी क्लासेसच्या शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास मुरुड पोलीस करीत आहेत.