अलिबाग । आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून अधिकृतरित्या सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित नगरपरिषदांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रांचा स्वीकार करण्यात येत आहे.
जिल्ह्यात खोपोली, अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड, पेण, उरण, कर्जत, महाड, रोहा आणि माथेरान या दहा नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडणार आहेत. प्रत्येक नगरपरिषदेतील प्रभागनिहाय आरक्षण, मतदारसंख्या आणि सदस्यसंख्येनुसार उमेदवारांची चाचपणी सुरू असून राजकीय गणितेही वेगाने बदलताना दिसत आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठी संबंधित नगरपरिषदेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विशेष कक्ष तयार केले असून सकाळी निश्चित वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. अर्ज भरताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती सादर करणे बंधनकारक आहे. दरम्यान, विविध पक्षांचे स्थानिक नेते, संभाव्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता व हालचाली वाढल्या आहेत.