महायुतीमध्ये राज्यात गट्टी, जिल्ह्यात कट्टी! युतीचा फॉर्म्युला फेटाळल्यानंतर मंत्री गोगावलेंचे खा.तटकरेंना आव्हान

10 Nov 2025 20:45:12
 pen
 
बेणसे । केंद्रात आणि राज्य भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची गट्टी असली तरी रायगडात मात्र कट्टीचे चित्र कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मंत्री भरत गोगावले यांनी दिलेला युतीचा फॉर्म्युला खासदार सुनील तटकरे यांनी फेटाळून लावल्यानंतर मंत्री गोगावले यांनी तटकरेंना आमनेसामने लढण्याचे आव्हानच देऊन टाकले आहे.
 
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीला युतीची ऑफर दिली होती. मात्र तटकरे यांनी ती उडवून लावली होती. यानंतर गोगावले यांनी, कोणाला पटो न पटो त्यांनी त्यांची ताकद दाखवावी आणि आम्ही आमची ताकद दाखवू. आता पाहूया दूध का दूध आणि पाणी का पाणी होते ते, असे आव्हानच दिले आहे. रायगड जिल्ह्यात भाजपसोबत युती करण्यास आमचे प्राधान्य आहे.
 
भाजपसोबत आमचा राष्ट्रीयस्तरावर अलायन्स आहे. ते तयार असतील तर ठीक, नाहीतर आम्ही आमचा मार्ग ठरवू. “आमची तयारी पूर्ण आहे. राष्ट्रवादी सोबत आली तर त्यांचे स्वागत, नाही आले तर आम्ही एकला चलो. काळजी करण्यासारखे काही नाही; अशी भूमिका गोगवले यांनी मांडली आहे.
 
दरम्यान, महाडमध्ये मनसे शहर प्रमुख पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी, मंत्री गोगावले यांनी भाष्य केले आहे. प्रत्येक गोष्टीला सीमा असतेे. कार्यकर्त्यांचा संयम सुटला की असे प्रकार घडतात. आमच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आणि ते बाहेर आले. गोगावलेंच्या या भूमिकेमुळे शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0