खालापूर । मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोल नाक्याजवळ घालण्यात आलेल्या दरोड्यातील तिघांच्या खालापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर पळून गेलेल्या दोघांच्या मागावर पोलीस आहेत. 28 सप्टेंबर रोजी रात्री दोन प्रवासी, दिनेश बुधाराम गोदारा व त्याचा मित्र सुरेंद्र जांगु, पनवेलच्या दिशेने जात असताना खालापूर टोलनाक्याजवळ थांबले.
तेथे अचानक पाच चोरट्यांनी त्यांना जबरदस्तीने मारहाण केली आणि एकूण 36 हजार 500 रुपये रोख आणि आधारकार्ड लंपास केले. घटनेची माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप यांना मिळताच, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाठलाग सुरू केला.
आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले होते. पोलिसांनी अनिल अशोक पवार याला ताब्यात घेत चौकशीस प्रारंभ केला. त्यानंतर आरोपी किशोर पवार व गुरुनाथ पवार यांनाही अटक केली. उर्वरित दोन आरोपींचा शोध पोलीस सुरू ठेवले आहेत. उपपोलीस निरीक्षक अशोक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई अर्जुन मोरे, दत्तात्रेय लोरे, पोलीस हवालदार संदेश कावजी, होमगार्ड गायकवाड, आयआरबी डेल्टा फोर्सचे कर्मचारी प्रविण सावंत व राजेश शिंदे यांनी धाडसी कारवाई केली. यामध्ये दरोड्यातील 15 हजार रुपये हस्तगत करण्यात आले.
मुंबई पुणे एक्स्प्रेस ने प्रवास करताना कायदेशीर थांब्यावरच वाहने थांबवावित, रोडच्या बाजूस झाडाझुडपात संशयित व्यक्ती लपून बसलेले दिसल्यास तात्काळ 112 या क्रमांकावर फोनद्वारे पोलिसांना कळवावे. खालापूर पोलीस- क्रमांक. 02192- 275033, 9325133929 - अशोक जगताप, पोलीस उपनिरीक्षक