नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर! अलिबाग, पेणचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव

07 Oct 2025 19:06:03
 alibag
 
अलिबाग | जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि ६ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत सोमवारी (६ ऑक्टोबर) पार पडली. यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी तीन नगराध्यक्ष, ओबीसी महिला प्रवर्गासाठी पाच, खुल्या प्रवर्गाचे दोन, खुला महिला प्रवर्ग चार, अनुसूचित जमाती प्रवर्गसाठी एक आणि अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग एक असे नगराध्यक्षपद राखीव असणार आहे.
 
राज्य निवडणूक आयोगाने आगामी नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आरक्षणाचा आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी खुला व ओबीसी महिला प्रवर्गानुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. अलिबाग नगरपालिका आणि पेण नगरपरिषद या दोन्ही ठिकाणी खुला महिला प्रवर्ग आरक्षित करण्यात आला आहे.
 
यामुळे या दोन्ही ठिकाणी महिलांसाठी निवडणूक लढविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच मुरुड-जंजिरा आणि रोहा या नगरपरिषदांना ओबीसी महिला प्रवर्गाचे आरक्षण मिळाले आहे. या दोन्ही ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील महिला उमेदवारांना निवडणुकीची संधी उपलब्ध होणार आहे. खालापूर आणि पोलादपूर या नगरपंचायतींना ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण देण्यात आले असून, या ठिकाणी मागासवर्गीय समाजातील उमेदवारांना संधी मिळणार आहे.
 
दरम्यान, म्हसळा नगरपंचायतीसाठी खुला महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणारा निर्णय झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटत आहे. तर खोपोली, माथेरानमध्ये सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. जाहीर झालेल्या आरक्षणामुळे रायगड जिल्ह्यातील महिलांसह मागासवर्गीय प्रवर्गातील नव्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याची नवी दालने खुली झाली आहेत.
नगरपरिषद नगराध्यक्षपद
ओबीसी महिला प्रवर्ग: मुरुड-जंजिरा, कर्जत, रोहा
सर्वसाधारण महिला प्रवर्ग: उरण, पेण, अलिबाग
नागरिकांचा मागास प्रवर्ग: महाड, श्रीवर्धन
सर्वसाधारण प्रवर्ग: खोपोली, माथेरान
नगरपंचायत नगराध्यक्षपद
अनुसूचित जमाती महिला: पाली
अनुसूचित जमाती प्रवर्ग: माणगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग:तळा
ओबीसी महिला प्रवर्ग:पोलादपूर, खालापूर सर्वसाधारण महिला म्हसळा.
Powered By Sangraha 9.0